अखेर एमपीएससी परीक्षा झाली… नाशिक विभागात 42 हजार 708 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नाशिक,

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (पूर्व) परीक्षा आज झाली आहे. नाशिक विभागात महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परीक्षा 2020 साठी 42 हजार 708 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर 21 हजार 703 विद्यार्थी गैरहजर होते. विभागातून 64 हजार 421 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. याच वर्षी 11 एप्रिल रोजी परीक्षा घेण्याचे नियोजन आयोगाकडून करण्यात आले होते, मात्र कोरोना प्रादूर्भावामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.

जिल्ह्यातील 58 केंद्रावर परीक्षा

नाशिक विभागातील 185 परीक्षा उपकेंद्रावर राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा (एमपीएससी) घेण्यात आली. नाशिक जिल्ह्यात 58 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून 22 हजार 419 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 58 केंद्रावर 14 हजार 932 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तर 7 हजार 487 विद्यार्थी गैरहजर होते. परीक्षेसाठी 1 हजार 900 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर नाशिक विभागासाठी 5 हजार 636 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.

अहमदनगर जिल्ह्यात 12 हजार 549 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

अहमदनगर जिल्ह्यातून 19 हजार 147 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 60 केंद्रावर 12 हजार 549 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तर सहा हजार 598 विद्यार्थी गैरहजर होते. सर्व परीक्षा उपकेंद्रावर पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. परीक्षेसाठी 1 हजार 702 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली होती.

धुळयात 2 हजार 497 विद्यार्थी गैरहजर

धुळे जिल्ह्यातून 7 हजार 749 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील 23 केंद्रावर 5 हजार 242 विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजर होते. तर 2 हजार 497 विद्यार्थी गैरहजर होते.

जळगावमध्ये 7 हजार 540 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

जळगाव जिल्ह्यातून 11 हजार 463 विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 35 केंद्रावर 7 हजार 540 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षेसाठी हजेरी लावली. तर 3 हजार 923 विद्यार्थी गैरहजर होते.

नंदुरबार जिल्ह्यात 2 हजार 445 विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

नंदुरबार जिल्ह्यात 3 हजार 643 विद्यार्थ्यांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते. जिल्ह्यातील 9 केंद्रावर 2 हजार 445 विद्यार्थ्यानी परीक्षा दिली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!