आसाराम बापू आश्रमच्या संचालकाला गुजरात पोलिसांकडून अटक; 12 वर्षांपासून होता फरार

नाशिक,

गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमाच्या संचालकाला गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. अहमदाबाद येथील प्राणघातक हल्ल्याचा त्याच्यावर आरोप असून या गुन्ह्यात हा संचालक 12 वर्षांपासून फरार होता. अटक केलेल्या संचालकाचे नाव संजय किशनकिशोर वैद आहे.

आसाराम बापूचा परम शिष्य असलेल्या संजय किशनकिशोर वैदवर अहमदाबाद येथे प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा दाखल आहे. तो 12 वर्षांपासून अहमदाबादमधून फरार होता. या दरम्यानच्या काळात वैद हा गंगापूर रोडवरील आसाराम बापू आश्रमात संचालक झाला.

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यातील फरार संजय वैद हा गुरुवारी (2 सप्टेंबर) सकाळी आश्रमातील गायींसाठी खाद्य खरेदी करण्यासाठी पंचवटी येथे गेला होता. संजय वैद हा ( एमएच 48 टी 3096) पिकपअ वाहनाने पंचवटीतील सेवाकुंज येथील नागसेठीया पशु खाद्य दुकान येथे आला होता. याचवेळी गुजरातच्या चार पोलिसांनी त्याला ताब्यात घेत गुजरातला नेले. गुजरात पोलिसांच्या या कारवाईची स्थानिक पोलिसांना माहीती नव्हती. वैद आश्रमात परतला नसल्यामुळे आसाराम बापू आश्रमाचे राजेश डावर (रा. सावरकरनगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पंचवटी पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला.

डावर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सावरकर नगर येथील आश्रमाचे संचालक वैद हे गुरूवारी (दि. 2) पंचवटीतील सेवाकुंज भागात गाईंना पशू खाद्य खरेदी करण्यासाठी नागसेठीया पशू खाद्य दुकानात गेले होते. वैद हे खरेदी करीत असतांना एका कारमधून आलेल्या अनोळखी चौघांनी त्यांना दमदाटी करीत वाहनात बसवून पळवून नेल्याचे तक्रारीत म्हटले होते. मध्यरात्री या संदर्भात गुन्हा दाखल झाला होता.

दरम्यान हे अपहरण नसून त्याला अहमदाबाद पोलिसांनी अटक केल्याची माहिती पंचवटी पोलिसांना मिळाली. तत्पूर्वी पंचवटी पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. अपहरणाच्या या गुन्ह्यात पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रोहित केदार तपास करत आहेत.

गुन्ह्याचे तपासाधिकारी एपीआय रोहीत केदार यांना या गुन्ह्यातील अपहरणकर्त्यांचा शोध घेण्याचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी भेट दिली. सेवाकुंज भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. पंचवटी पोलिसांनी दोन टीम बनवून ज्या गाडीतून वैद यांना नेण्यात आले त्या गाडीचा शोध सुरु केला. मात्र सीडीआरच्या विेषणावरुन अपह्रत व्यक्ती अहमदाबाद येथील प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात बारा वर्षांपासून फरार असल्याची माहिती समोर आली. या फरार आरोपीला अटक करण्यासाठी अहमदाबाद क्राईम ब-ँचचे अधिकारी नाशिकला आले व त्यांनी वैदला अहमदाबादला नेले असल्याचे समोर आले आहे. याबाबत साबरमती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!