आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर – पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी

नंदुरबार – दि.23 : आदिवासी बांधवांना कुक्कुटपालनसारख्या व्यवसायासाठी आर्थिक सहकार्य करून रोजगार उपलब्ध करून देण्यावर भर असल्याचे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा  जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी  यांनी केले.

खापर येथे आयोजित खावटी कीट वाटप कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, दिलीप नाईक, ॲड. गोवाल पाडवी, प्रताप वसावे आदी उपस्थित होते.

ॲड.पाडवी म्हणाले, खावटी योजनेचा लाभ देणे हा तात्पुरता दिलासा आहे. आदिवासी बांधवांचे दारिद्र्य दूर करण्यासाठी आणि त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी त्यांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. आदिवासी विकास विभाग त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहे. विभागामार्फत आदिवासी बांधवांना रोजगारासाठीच्या योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री.वळवी, श्री.नाईक आणि श्री.वसावे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. पालकमंत्र्यांच्या हस्ते खापर आणि ब्राह्मणगाव येथील एकूण 606 लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात खावटी कीटचे वाटप करण्यात आले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!