गरीब व गरजू रुग्णांना कर्करोगावरील उपचार माफक दरात मिळावेत – मंत्री सुनिल केदार
नागपूर प्रतिनिधी
दि. 31 : गोर – गरीब कर्करोगग्रस्त रुग्णांना माफक दरात सर्वोत्तम उपचार मिळावेत. तसेच कर्करोगावर नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये संशोधन होणे गरजेचे असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास, क्रीडा व युवक कल्याणमंत्री सुनिल केदार यांनी व्यक्त केले.
जामठा येथील डॉ.आबाजी थत्ते सेवा आणि अनुसंधान संस्थेअंतर्गत नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट कार्यरत आहे. श्री. केदार यांनी आज तेथे सदीच्छा भेट देऊन पाहणी केली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष ॲड. सुनिल मनोहर, सचिव शैलेश जोगळेकर, प्रशांत वैद्य, अनिल वडपल्लीवार उपस्थित होते.
मध्य भारतातील सगळ्यात मोठ्या कॅन्सर इन्स्टिट्यूट मध्ये समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत रुग्णांवर उपचार होणे गरजेचे आहे, असे श्री. केदार म्हणाले. यावेळी शैलेश जोगळेकर यांनी इन्स्टिट्यूटच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.
25 एकरच्या परिसरात साधारणत: 470 बेड क्षमतेच्या या कॅन्सर इन्स्टिट्यूटमध्ये कर्करोग रुग्णांना आरोग्य सुविधेसोबतच, जेवण, रुग्णांसाठी बससेवा, औषधोपचार, आदीसह अन्य सुविधा विनाशुल्क उपलब्ध आहेत.