महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून आढावा
नागपूर प्रतिनिधी
दि. 21 : महानगरपालिका क्षेत्रातील विविध विकास कामांचा आढावा आज पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी घेतला. महानगरपालिका क्षेत्रातील प्रलंबित प्रस्ताव तातडीने निकाली काढावेत तसेच यापुढे सार्वजनिक उपक्रमाच्या प्रकल्पांमधून महानगरपालिकेला उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होईल, याकडे लक्ष देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर महानगर विकास प्राधिकरणचे (एन.एम.आर.डी.ए.) सभापती मनोज सूर्यवंशी, नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब देशमुख, अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, आदींसह सार्वजनिक बांधकाम विभाग महानगरपालिका विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये झोपडपट्टी पुनर्वसन अंतर्गत येणाऱ्या निवासी सदनिकामधील नागरिकांच्या समस्यांवर चर्चा झाली. यासंदर्भात परिसरातील माजी नगरसेवक मंसूर खान यांनी निवेदन सादर केले होते. काही लाभार्थ्यांना घरे मिळाली नसल्याची तक्रार आहे. याबाबत शुक्रवारला बैठक घेऊन तोडगा काढण्याबाबतचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
बाजीराव साखरे ग्रंथालयाचे अद्यावतीकरण व लहान मुले आणि वरिष्ठ नागरिक यांच्यासाठी वाचन कक्ष तयार करण्याबाबतचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. या ठिकाणी अद्यावत सोयीसुविधा व स्पर्धा परीक्षा संदर्भात मार्गदर्शन केंद्र निर्माण करण्याचे निर्देश देण्यात आले. नियमित पाणीपुरवठा, खानपानाची सुविधा, तसेच या ठिकाणच्या आवश्यकतांचे एक सर्वेक्षण करण्याबाबतही पालकमंत्र्यांनी सूचित केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान याच्या आधुनिकीकरण करण्याबाबतचे सादरीकरण यावेळी झाले.
नागपूर सुधार प्रन्यासकडे हा प्रकल्प सध्या आहे.त्यामुळे चौकशीअंती विकासासाठी मनपाकडे हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात यावा, असे त्यांनी यावेळी सूचवले. महानगरपालिका आयुक्त राधाकृष्ण बी. यांनी हस्तांतरानंतर आवश्यक विकास कार्य करण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट केले.
भिक्षूनी वसतीगृह, विपश्यना केंद्र व उद्यान नव्याने तयार करण्याबाबतची चर्चा यावेळी झाली. श्रीलंकन पद्धतीने वास्तुचा शिल्पआदेश तयार करण्याचे त्यांनी यावेळी निर्देशित केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह अंबाझरी नागपूर संदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली. तथापि, संबंधित विभागाचे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे ही बैठक पुढे घेण्यात येणार आहे. नागपूर शहरातील प्रकल्पांची कामे करताना सार्वजनिक उपक्रमांमध्ये सार्वजनिक सहभाग राहील, असे नियोजन करण्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याच बैठकीमध्ये कोरोना काळात प्रत्यक्ष बाधितांच्या शुश्रूतेमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, नर्स, आणि पॅरा मेडिकल स्टाफ तसेच फ्रंटलाईन वर्कर्स यांच्या सुरक्षेसाठी वातानुकूलित मास्क उपकरणाचे प्रात्यक्षिकही सादर करण्यात आले.