कोरोनामुळे हिरावलेल्या विचारवंताचे कार्य लोकांपर्यंत पोहचवा – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
कोरोना योद्ध्यांचा सत्कार, कलावंतांना मदतीचे वाटप
नागपूर, दि. 17 :
सामाजिक क्षेत्रात काम करणारे विचारवंत, कार्यकर्ते कोरोनाने आपल्यापासून हिरावून नेले. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान झाले आहे. या विचारवंतांचे कार्य पुस्तकाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न व्हावेत, असे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले. डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशन व पद्मश्री कल्पना सरोज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी राष्ट्रभाषा संकुलातील श्री साई सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
कोरोनामुळे निधन झालेल्या आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, कार्यकर्ते यांना यावेळी आदरांजली वाहण्यात आली. पालकमंत्र्यांनीही त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. याप्रसंगी कोरोना योद्ध्यांचा सत्कार व कलावंतांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले. वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, उद्योजिका पद्मश्री कल्पना सरोज, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक प्रशांत जम्बोलकर यांची कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती.
कोरोनामुळे आपल्या जवळच्या अनेकांनी जीव गमाविला. या महामारीचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने सुरुवातीपासूनच ठोस पावले उचलली. नागपुरातही युद्धपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करून संसर्ग रोखण्याचा प्रयत्न केला. बाधितांवरील उपचाराकरिता आवश्यक सामग्रीसाठी शासकीय वैद्यकीय रुग्णालय व मेयो रुग्णालयाला सुमारे शंभर कोटी रुपये उपलब्ध करून दिले. शासनाच्या प्रयत्नांना जनतेची साथ मिळाल्याने सध्या कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका कायम असल्याचे तज्ज्ञ सांगत असल्याने प्रत्येकाने स्वयंसुरक्षेसाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची करण्याची गरज असल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत म्हणाले.
कोरोनामुळे पालक गमाविलेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी शासनाने योजना जाहीर केली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल. जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम गतिमान करण्यात आली आहे. गावखेड्यातील लोकांपर्यंत लस पोहोचविण्यासाठी महापारेषणने विदर्भात 200 जीवनरथ लसीकरण वाहने उपलब्ध करून दिली आहेत. तसेच ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी सुद्धा निधी उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री डॉ. राऊत यांनी सांगितले.
नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्रात नवीन पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार अभ्यासक्रम तसेच 615 खाटांचे रुग्णालय सुरु करण्यासाठी राज्य शासनाने 1165 कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासकीय वैद्यकीय रुग्णालय, मेयो रुग्णालयाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्यासोबतच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अद्ययावत प्रसूती केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे गोरगरिबांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळण्यास मदत होईल, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.
कोरोनामुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, अनेकांच्या घराचा आधार हरविला. असे संकट पुन्हा येऊ नये, यासाठी सर्वांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे श्रीमती सरोज यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे मुख्य संयोजक डॉ. अनिल हिरेखण यांनी सत्कारमूर्ती कोरोना योद्ध्यांच्या कार्याची तसेच कोरोनाने निधन झालेल्या विचारवंत, कार्यकर्त्यांच्या कार्याची माहिती दिली. डॉ. गिरीश गांधी फाऊंडेशनचे अध्यक्ष श्रीराम काळे, उद्योजक प्यारे खान, डॉ. पुरणचंद्र मेश्राम, डॉ. श्रीकांत तिडके, डॉ. सच्चिदानंद फुलकर, अनिरुद्ध वनकर, घनश्याम डकार यावेळी उपस्थित होते.