पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची कोराडी देवस्थानास भेट
नागपूर, दि. 16 :
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी गुरुवारी सायंकाळी कोराडी येथील महालक्ष्मी जगदंबा देवस्थानास भेट देत दर्शन घेतले. तसेच देवस्थान परिसरात जिल्हा व पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलेल्या कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेतला.
जिल्हाधिकारी श्रीमती विमला आर., नासुप्र सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त मनीष कलवानिया, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल किटे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. राऊत यांनी कोराडी देवस्थान परिसरातील पोलीस नियंत्रण कक्षातील सीसीटीव्ही यंत्रणा, कोविड लसीकरण केंद्राला भेट देत पाहणी केली. सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा परिषद आणि महानिर्मिती औष्णिक विद्युत केंद्र कोराडी यांच्या संयुक्त विद्यमाने ७ ते १४ ऑक्टोबरदरम्यान निःशुल्क कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात ५९४ जणांचे लसीकरण करण्यात आले.