अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित प्रत्यक्ष पंचनामे करा – पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

‘थेट लाभ हस्तांतरण खत क्षेत्रात’ परिसंवाद

शेतकरी उत्पादक कंपनीच्या प्रोसेसिंग युनिटचे उदघाटन

नागूपर,

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतकरी हवालदिल झाला आहे. याबाबत त्वरित प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून पंचनामे करण्याचे आदेश पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी दिले. त्याबाबत पाठपुरावा करुन शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाईचा मोबदला देण्यात येईल, असे सांगितले.

कळमेश्वर तालुक्यातील उबाळी येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कृषक भारती को-ऑपरेटीव्ह कंपनी व खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ‘थेट लाभ हस्तांतरण खत क्षेत्रात’ परिसंवाद व मोहपा येथे नवअनंत शेतकरी उत्पादन कंपनीतर्फे आयोजित संत्रा वॅक्सिन, ग्रेडिंग, पैकेजींग व प्रोसेसिंग युनिटचे उद्घाटन पशुसंवर्धन मंत्री श्री. केदार यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी ते बोलत होते.

कळमेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाबाराव पाटील, पंचायत समितीच्या सभापती  जयश्री वाळकेपंचायत समितीचे उपसभापती नरेंद्र  पलटकर, जिल्हा परिषद सदस्य देवानंद कोहळे, महेंद्रजी डोगरे, पिंकी करौती, पंचायत समिती सदस्य विजय भगे, प्रभाकर भोसले, वंदना मोरे, मालिनी बसू,  भरत दादा भिंगारे, कृषी उद्योग नागपूरचे व्यवस्थापक सुनील सूते, जिल्हा विपणन अधिकारी राजेश तरले, कळमेश्वर सहकारी खरेदी विक्रीचे अध्यक्ष बाबाराव कोडे  विभागीय व्यवस्थापक बिपिन चौहान,  अशोक  भागवत, मनोहर कुंभारे, श्रावण भिंगरे,श्री. मोरे, व्यवस्थापकीय संचालक राकेश मानकर  उपस्थित होते.

कृषक भारती को-ऑपकडून शेतकऱ्यांना चांगली भूमिका आहे. कृभको व इफको संस्थेद्वारे शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे नियमित मिळत आहे. देशात या दोन्ही कंपन्या अग्रेसर असल्याचे त्यांनी सांगितले.

जोपर्यंत शेतकरी स्व:त व्यापाराकडे वळणार नाही तोपर्यंत त्यांना योग्य दर मिळणार नाही. शेतकरी उत्पादक कंपनीच्या युनिटमुळे येथील संत्रा व मोसंबी कोलकात्ता तसेच बांग्लादेशात विक्रीसाठी जात आहे ही आनंदाची बाब आहे. अशाच प्रकारे युरोप व आखाती देशात सुध्दा येथील संत्रा गेला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

लोकांचा या व्यवस्थेवर विश्वास बसला पाहिजे. एनआरसीद्वारे नर्सरी व्यवसाय चांगला झाला आहे. यावर्षी नर्सरीद्वारे 1 लाख 50 हजार नवीन रोपे मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. कृनिंग मशिनचा उपयोग या भागातील शेतकऱ्यांनी संत्रा उत्पादन प्रक्रियेत केला त्यामुळे त्याचा लाभ शेतकऱ्यांना झाला. शास्त्रज्ञांद्वारे संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या शेतावर जावून फळगळतीबाबत पाहणी केली आहे. त्याचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. त्यानंतर त्यावर कृषी विभागाद्वारे तात्काळ उपाय योजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई मोबदल्यासाठी शासन धोरणात बदल करुन सोयी सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्याद्वारे ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यास मदतच होणार आहे.कर्तव्याला विसरणार नाही. शेतकऱ्यांनी शेती सोबतच मत्स्य पालनावर भर देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी  कृषक भारती तर्फे आयोजित कार्यक्रम परिसंवादाची पार्श्वभूमी समजावून सांगताना बिपिन चौहान व मान्यवरांनी शेतकरी वर्ग वा सहकारी संस्थांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने खत खरेदी करताना आधार कार्ड घेऊन करावे, असे निवेदन केले व जमिनीचा पोत सुधारण्यासाठी कृभको तर्फे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले सेंद्रिय खत व जैविक तरल खत वापरण्याविषयी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सरपंच प्रतिभा पालटकर व हर्षलता घाटोळे यांनी केले. या कार्यक्रमास ग्रामस्थ, अधिकारी, कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!