नाविन्यपूर्ण संकल्पनांच्या अंमलबजावणीतून लोकाभिमुख प्रशासन शक्य – विभागीय आयुक्त डॉ.संजीव कुमार
प्रशासनातर्फे भावपूर्ण निरोप
नागपूर, दि. 14 : नाविन्यपूर्ण संकल्पनांची अंमलबजावणी केली तरच आपण जनतेला लोकाभिमुख प्रशासन देवू शकतो. प्रशासनामध्ये वैयक्तिकऐवजी सामूहिक जबाबदारीच्या तत्वाचा स्वीकार केल्यामुळे कोविडसारख्या परिस्थितीवर सहज मात करणे शक्य झाले आहे, असे प्रतिपादन मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त तथा नागपूर विभागाचे मावळते विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी आज येथे केले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात डॉ. संजीव कुमार यांना निरोप देण्यात आला. प्रभारी विभागीय आयुक्त तथा जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., वनामतीच्या संचालक माधवी खोडे, नरेगा आयुक्त अंकित गोयल, नक्षल सेलचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, मुख्याधिकारी राहुल कर्डीले तसेच वरिष्ठ अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
निरोप समारंभाप्रसंगी डॉ. संजीव कुमार म्हणाले की, नागपूर विभागात काम करतांना सर्वांचे महत्वपूर्ण सहकार्य लाभल्यामुळे कोरोना साथीच्या काळात उत्तम काम करता आले. त्याबरोबच महसूलविषयक व इतर विभागातील काम करण्यास मदत झाल्याची कृतज्ञतापूर्ण भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यावेळी म्हणाले, निरंतर सर्वेक्षणाच्या कामात संजीव कुमार यांच्याकडून मोठे मार्गदर्शन झाले. प्रत्येक टप्प्यावर कशा प्रकारे काम करावे याचे बाळकडू त्यांनी दिल्याचे सांगितले. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या काळात पहिल्या व दुसऱ्या लाटेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप चांगले काम करता आले. कोणतेही प्रश्न कसे हाताळायचे, विषयाच्या खोलात जावून ते कसे सोडवावयाचे हे त्यांच्यामुळेच कळाले. तसेच विकासाबाबत मूलभूत विचार करणे आवश्यक असल्याचे कळाले. शहरातील कोरोना स्थिती नियंत्रित करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती, असेही त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुंभेजकर यांनी कोविडच्या काळात संजीव कुमार यांनी केलेल्या कामाची माहिती दिली. कोविड साथीच्या काळात विविध उपाययोजना राबवितांना त्यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याने जिल्हा प्रशासनाला मदत कार्य करणे सुलभ झाल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कर्डिले, म्हणाले की, आरोग्यासोबतच शिक्षणासही प्राधान्य दिले. या क्षेत्रात नेहमी त्यांच्याकडून प्रेरणा मिळाली, असे ते म्हणाले. शिक्षण विभागातील अनेक प्रश्न त्यांनी सोडविण्यास मदत केली. चांगले काम करण्याची प्रेरणा त्यांच्याकडून मिळाली. यावेळी वनामतीच्या संचालिका श्रीमती खोडे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी, यांची समयोचित भाषण झाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त मिलिंदकुमार साळवे यांनी तर उपस्थितांचे आभार उपायुक्त हरीष भामरे यांनी मानले.