मदतीसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार – पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर ,

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे रस्ते, पूल, शेती व अन्य झालेल्या नुकसानासंदर्भात पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. शासनाकडे तातडीने पाठपुरावा करण्यासाठी प्रशासनाने प्रस्ताव तातडीने पाठवावे. याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करु, असे त्यांनी स्पष्ट केले.

खरडून गेलेली शेती तसेच क्षतीग्रस्त झालेली घरे, खचलेले रस्ते-पूलांसाठी शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावांचा विभागनिहाय पाठपुरावा करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

यावेळी जिल्हाधिकारी विमला आर., मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, जिल्हा कृषी अधिक्षक मिलींद शेंडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे डि. पी. वर्मा, कार्यकारी अभियंता अनिल येरखेडे, जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता सुभाष गणोरकर, कार्यकारी अभियंता रोशन हटवार, राजेश ढुमणे यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर 2021 या महिन्यात पुरामुळे 33 टक्क्यांच्या वर नुकसान झालेले पिकाखालील एकूण क्षेत्र हे 6250.1 हेक्टर आर. असून 11 हजारावर शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती यावेळी अकृष्क तहसिलदार श्रीराम मुदंडा यांनी दिली. तर  1 एप्रिल ते 3 ऑक्टोबर 2021 दरम्यान झालेल्या अतिवृष्ट्रीमुळे व पुरामुळे 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पात्र 44 प्रकरणांपैकी 40 प्रकरणांत मदत देण्यात आली आहे. तर एकूण 125 लहान मोठी जनावरे मृत्युमुखी पडलीत. त्यांच्यासाठी प्राप्त 27 लक्ष अनुदानापैकी 14 लक्ष अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. तर आणखी 13.15 लक्ष अनुदानाची गरज आहे.

यासोबतच अन्य विभागनिहाय नुकसानाचे सादरीकरण करण्यात आले. मत्स्यव्यवसाय करणाऱ्या संस्थाचे पुराच्या पाण्याने खुप नुकसान झाले. वेणा, कोलार, नांदागोमुख, उमरी, चंद्रभागा, मधुगंगा या जलाशयातील मासे, मासोळी व मत्स्यबोटुकलीचे साधारणत: 2 कोटीच्या जवळपास नुकसान झाले आहे. मच्छीमार संस्थांचे मदत प्रस्तावांचा सातत्याने पाठपुरावा करण्याचे पालकमंत्री महोदयांनी निर्देशित केले.

कडबी चौक उड्डाणपुलाच्या खाली उतरणाऱ्या रॅम्प संदर्भात पुर्नपाहणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!