अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, घरानंतर आता शिक्षण संस्थेच्या कार्यालयात इन्कम टॅक्सची धाड
नागपूर
भ-ष्टाचाराच्या आरोपात अडकलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. आयकर विभागाने काल (17 सप्टेंबर) अनिल देशमुख यांच्या नागपूर, काटोल आणि मुंबई येथील निवासस्थानी धाडी टाकल्या. त्यानंतर आयकर विभागाने आपला मोर्चा त्यांच्या नागपूर येथील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयाकडे वळवला आहे. आयकर विभागाचे अधिकारी साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयातील कागदपत्रांसह आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत.
100 कोटी वसुलीच्या प्रकरणामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्री पद गमवावे लागले. त्यानंतर त्यांच्यामागे प्रवर्तन निदेशालय म्हणजेच ईडी, सीबीआय आणि आता आयकर विभागाच्या धाडींचा ससेमिरा लागला आहे. काल आयकर विभागाच्या अधिकार्यांनी अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानी धाडी टाकल्या. यानंतर अनिल देशमुख यांचे चिरंजीव आणि जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांच्या फ्लॅटची सुद्धा झडती घेतली. आज (18 सप्टेंबर) सकाळपासून आयकर विभागाच्या अधिकार्यांनी नागपूर येथील साई शिक्षण संस्थेच्या कार्यालयात धाड टाकली आहे. गेल्या एक तासापासून आयकर विभागाचे अधिकारी कार्यालयातील कागदपत्रांसह आर्थिक व्यवहारांची तपासणी करत आहेत.
एकीकडे अनिल देशमुख तपासात सहकार्य करत नाहीत म्हणून ईडी न्यायालयात गेली आहे. ईडीने अनेक वेळा नोटीस बाजावल्यानंतरही देशमुख अद्यापही चौकशीसाठी हजर झालेले नाहीत. ते सातत्याने नॉट रिचेबल लागत आहेत. त्यामुळे ईडी न्यायालयात गेली आहे. तर दुसरीकडे आयकर विभागाने देखील कारवाई सुरू केली आहे. त्यामुळे आता अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्याचे दिसत आहे.