कैक संकटं पेलून उभा केला प्रेमाचा संसार; अर्ध्यावरच जवानाच्या पत्नीनं सोडली साथ, नागपुरातील हृदय हेलावणारी घटना
नागपूर,
गेल्या पंधरा वर्षांपासून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्या दाम्पत्याचं विश्व एका क्षणात उद्धवस्त झालं आहे. घरच्यांचा प्रेमाला विरोध असताना, त्यांचा विरोध डावलून लग्न केलेल्या संबंधित महिलेचा डेंग्युमुळे दुर्दैर्वी अंत झाला आहे. अनेक संकटं पेलून उभा केलेला प्रेमाचा संसार अर्ध्यावर मोडून त्या निघून गेल्या आहेत. पण जातानाही त्यांनी आपल्या पतीच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतला आहे. डेग्यूबाबत लवकर टेस्ट करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिली नाही. त्यामुळे उपचारात उशीर झाल्यानं त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोपी कुटुंबीयांकडून केला जात आहे.
तारका पिल्लेवार असं 30 वर्षीय मृत महिलेचं नाव आहे. तर प्रलय पिल्लेवार असं त्यांच्या पतीचं नाव आहे. प्रलय हे इंडियन एअर फोर्समध्ये नोकरी करत असून अलीकडेच त्यांची बदली अंदमान याठिकाणी झाली आहे. झोपडपट्टीत राहून शिकलेले पिल्लेवान यांनी आपल्या प्रेमाला मिळवण्यासाठी बराच संघर्ष केला आहे. तारका यांच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमाला विरोध असतानाही त्यांनी एकमेकांशी लग्न केलं होतं. मागील 15 वर्षांपासून एकमेकांवर जिवापाड प्रेम करणार्या दाम्पत्याचा संसार अर्ध्यावरच मोडला आहे. त्यांना एक वर्षाचा मुलगा देखील आहे.
पती प्रलय पिल्लेवार यांची अंदमानला बदली झाल्यामुळे मृत तारका या नागपुरातील कौशल्यायन नगर येथे आपल्या सासू-सासर्यांसोबत राहत होत्या. दरम्यान दहा दिवसांपूर्वी त्यांना अचानक थंडी आणि ताप आला होता. त्यामुळे त्यांनी जवळच्या रुग्णालयात उपचार घेतले. डॉक्टरांनी केवळ गोळ्या औषध देऊन घरी जाण्यास सांगितलं. तारका यांना तेवढ्यापूरतं बरं वाटलं. पण नंतर त्यांची प्रकृती अधिक खालावत गेली. तसेच त्यांच्या रक्ताच्या उलट्या देखील झाल्या. त्यानंतर रक्ताची चाचणी केली असता प्लेटलेट कमी झाल्याचं निदर्शनास आलं आणि डेंग्यू झाल्याचं निष्पन्न झालं.
पत्नी आजारी असल्याचं कळताच पती प्रलय पिल्लेवार यांनी तातडीनं नागपूर गाठलं. दोन दिवसांपूर्वी पत्नी आल्यानंतर तारका यांनी आपल्या पतीच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतला आहे. याघटनेनं एका क्षणात पंधरा वर्षांच्या प्रेमाचा हृदयद्रावक शेवट झाला आहे. विशेष म्हणजे नागपूर शहरात आणि परिसरात सध्या डेंग्यूची संख्या झपाट्यानं वाढत आहेत. गेल्या सात दिवसांत 287 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागपूर विभागात आजपर्यंत आढळलेल्या एकूण डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अडीच हजारहून अधिक झाली आहे.