ओबीसी समाज निवडणुकीत राज्य सरकारला सोडणार नाही – बावनकुळे
नागपूर,
महाविकास आघाडी सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल करून विश्वासघात केल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. याचबरोबर निवडणुकीत ओबीसी जनता महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवेल असा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर बावनकुळे बोलत होते.
सरकारमधील मंत्री ओबीसींच्या आरक्षणशिवाय निवडणुका होऊ देणार नाही असे सांगतात. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका घोषित केल्याच कशा असा प्रश्न त्यांनी यावेळेस उपस्थित केला आहे. ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण सरकारला द्यायचे नव्हते. फक्त मंत्री अशा घोषणा करून समाजाची दिशाभूल करत होते. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे. त्यामुळे ओबीसी जनता या निवडणुकीत महाविकास आघाडीला त्यांची जागा दाखवेल असेही बावनकुळे म्हणाले आहेत.
सरकारचा खोटारडेपणा उघड –
ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण परत मिळवून दिल्याशिवाय राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका होऊ देणार नाही असे आश्वासन राज्य सरकारने ओबीसी समाजाला दिले होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुकांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकारचा खोटारडेपणा उघड झाल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.
आरक्षण मिळू नये यासाठी गट सक्रिय –
ओबीसी समाजावर राजकीय आरक्षण मिळू नये यासाठी महाविकास आघाडीमधील एक गट सक्रिय होता, असा आरोप बावनकुळे यांनी केला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर राज्य निवडणूक आयोगानेदेखील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. ज्यामुळे त्या गटाचा विजय झाल्याचेही ते म्हणाले आहेत .
भाजप देणार ओबीसींना उमेदवारी –
पक्षाच्या आदेशानुसार ओबीसी समाजाच्या प्रतिनिधींना निवडणुकीत संधी देऊ. निवडणूकीत ओबीसी जनता राज्य सरकारला सोडणार नसल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत. सुप्रीम कोर्टाने निकाल दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने गांभीर्य दाखविल्यास तीन महिन्यात इंपेरिकल डेटा जमा करणे शक्य होते. मात्र, सरकारने ओबीसी आरक्षण घालवण्यासाठीचे महाविकास आघाडी सरकारमधील गट सक्रिय होता. भविष्यातील निवडणुकीत भाजप ओबीसींच्या जागा ओबीसी उमेदवारांनाच देणार आहे. महाविकास आघाडी सरकारने ओबीसींचा घात केल्याने ओबीसी जनता सरकारला सोडणार नसल्याचे बावनकुळे म्हणाले आहेत.