शाळाबाह्य मुलांना प्रवेश देण्याची तात्काळ व्यवस्था करा – शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू
नागपूर, दि. 26:
गोपालक भटक्या विमुक्त जाती-जमाती व इतर सर्व शाळाबाह्य मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश देण्याची तात्काळ व्यवस्था करतानाच त्यांच्या शिक्षणाच्या संपूर्ण नियोजनासाठी विभागीय समन्वयकाची नियुक्ती करा, असे निर्देश शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत श्री. कडू बोलत होते.
खासदार डॉ. विकास महात्मे, उपसंचालक तथा विभागीय अध्यक्ष डॉ. वैशाली जामदार, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, श्रीमती माधुरी सावरकर, सहायक संचालक सतीश मेंढे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकार आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. गोपालक भरवाड बेडे, पाडे, वाडे मोठ्या प्रमाणावर असून, यामध्ये 14 वर्षे वयोगटापर्यंतची मुले-मुली शिक्षणापासून वंचित आहेत. स्थलांतरीत मुलांच्या शिक्षणामध्ये खंड पडतो. स्थलांतर झाले तरीही अशा शाळाबाह्य मुलांना तत्काळ नजीकच्या गावातील शाळांमध्ये प्रवेश देण्याची व्यवस्था करावी, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले.
स्थलांतरामुळे बालकांच्या आरोग्याची वेळोवेळी तपासणी करावी. पौगंडावस्थेत आलेल्या मुला-मुलींना शारीरिक बदलाबाबत तसेच स्वच्छतेविषयक माहितीही आरोग्य विभागातर्फे द्यावी, असेही त्यांनी सांगितले.
विभागीय समन्वयक म्हणून सहायक शिक्षक प्रसेजनजित गायकवाड यांची नियुक्त करण्यात यावी. भटक्या जमातीतील शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शिक्षण, प्रवेशाचे संपूर्ण नियोजन करावे. या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, त्यांच्या वसतिगृहाची पूर्ण व्यवस्था करण्यासाठी शासनाकडून निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या वसतिगृह सुरु करण्याचे प्रस्ताव पाठवावेत. तोपर्यंत या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह भाडेतत्वावर घ्यावे, असे निर्देश राज्यमंत्र्यांनी दिलेत. नागपूर महानगरपालिका हद्दीत असलेल्या अशा शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबतचा प्रश्न सोडविण्यासाठी पुढील आठवड्यात आयुक्तांसोबत बैठक आयोजित करावी, अशा सूचना यावेळी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिल्या.