शिवसेनेचीच आहे नारायण राणेंची भाषा, महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा – रामदास आठवले
नागपूर,
’केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जी भाषा होती ती शिवसेनेच्या शिवसैनिकांचीच भाषा होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा अनेकदा अशी शिवसैनिकी भाषेत भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री यांना राग आला असेल तर उत्तर द्यायला हरकत नाही. पण पोलिसांकडून पकडण्याची भूमिका राज्यसरकारने चुकीचा घेतलेला निर्णय आहे’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. ते नागपूर येथे आरपीआय पक्षाच्या बैठकीला आले होते. यानंतर त्यानी रवी भवन येथे पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली.
’नारायण राणे हे शिवसैनिक होते. मूळ शिवसैनिकांनी मुख्यमंत्री हे तत्पर नसल्याने ते उत्तर दिले आहे. यावर त्यांनी पलट उत्तर देण्याची भूमिका घ्यायला हवी होती. यात नारायण राणे यांना पकडण्याची कारवाई चुकीची आहे. त्यांना जामीन मिळाला, त्यांनी काही कोणाचा खून केला नाही. यामुळे ही कारवाई अयोग्य होती’, असे आठवले म्हणाले. ’यापूर्वी अनेक शिवसैनिकांनी अशी भाषा वापरली. मात्र त्यांना त्यावेळी अटक झाली नाही. अटक झाली असेल तर दाखवा’, असाही सवाल रामदास आठवले यांनी उपस्थित केला.
’नारायण राणेंवर अन्याय’
’नारायण राणे यांच्यावर जी अटकेची कारवाई झाली ती पोलिसांची चूक नाही. सरकारच्या आदेशाने पोलिसांनी इतकी हिम्मत केली आहे. पण सरकारने दबाव आणून पोलिसांमार्फत केलेली ही कारवाई चुकीची आहे. जाणीवपूर्वक कारवाई करत नारायण राणे यांच्यावर अन्याय केला आहे’, असेही आठवले म्हणाले.
’शिवसेनेचीच आहे नारायण राणेंची भाषा
त्यामुळे महाविकास आघाडीच्या लोकांनी मारत बसा माशा
आता या सरकारकडून नाही लोकांना अजिबात काही आशा
त्यामुळेच नारायण राणेंची पाहायला मिळत आहे अशी भाषा’, असे आठवलेंनी आपल्या शैलीत म्हटले आहे.
’देशाच्या स्वातंत्र्याला किती वर्षे झाली हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माहिती नाही. कुणाला तरी विचारतात हिरक महोत्सव आहे काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती. देशाच्या स्वातंत्र्यदिनाची माहिती नसावी? किती चीड आणणारी गोष्ट आहे. बाजुला एखादा सेक्रेटरी ठेव आणी बोल म्हणावं. सरकार कोण चालवतंय ते कळतच नाही. ड्रायवरच नाही’, असे भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटले आहे.
राणेंच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांना अटकही करण्यात आली होती. नंतर त्यांची जामीनावर सुटका झाली. दरम्यान, भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. त्यामुळे दोन्हीही पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षण आता राज्य सरकारच्याच हातात – आठवले
मराठा आरक्षण संदर्भात मंत्री रामदास आठवले बोलताना म्हणाले, की ’केंद्र सरकारने आरक्षणाचा अधिकार आता राज्याला दिला आहे. यामुळे आता ताट वाढून दिले आहे. जेवणाचे काम राज्याने करावे. राज्याला अधिकार असल्याने ज्या पद्धतीने तामिळनाडू सरकारने 50 टक्यांच्या वर आरक्षण दिले आहे. त्याच पद्धतीने राज्य सरकारने मराठ्यांना 12 टक्के आरक्षण द्यायला हरकत नाही. त्याबद्दल विचार राज्य सरकारने करावा. विनाकारण नेहमी नेहमी केंद्राकडे बोट दाखवून चालणार नाही. यामुळे राज्य सरकारने तो निर्णय घ्यावा’.
’गरिब मराठ्यांना आरक्षणाची गरज’
’मराठा समाजातील अनेक लोक हे धनधांडगे आहेत. अनेक मुख्यमंत्री झाले. यामुळे ते गरीब आहेत, आर्थिक दुर्बल आहेत हे सिद्ध करण्यास अपयशी ठरले आहेत. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात टिकला नाही. पण ज्या लोकांचे उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे. त्यांना आरक्षणाची गरज आहे. ज्यांचे उत्पन्न 8 लाखाच्या वर आहे. त्यांना आरक्षणाची, नोकरी आरक्षणाची गरज नाही. यामुळे यांना जमत नसेल तर सत्ता सोडावी. मी मराठा समाजाची भूमिका मांडतो. त्यांना आरक्षण मिळवून देतो’ असेही आठवले म्हणाले.