जगविख्यात वैज्ञानिकांना आदर्श मानून चांगले कार्य करण्याची प्रेरणा घ्या – नागपूरचे पालकमंत्री आणि राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे दिव्यांगाना आवाहन

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या एडीआयपी योजनेअंतर्गत दिव्यांग जणांना सहाय्यकारी साहित्याचे वितरण संपन्न

नागपूर 21   ऑगस्ट 2021

स्टिफन हॉकिंग, अल्बर्ट आईन्स्टाईन, थॉमस एडिसन यांनी आपल्या शारीरिक अपंगत्वावर मात करत आपल्या बुद्धिचातुर्याच्या जोरावर जगविख्यात वैज्ञानिक म्हणून  आपले  नाव प्रस्थापित केले. या वैज्ञानिकांना आपले मार्गदर्शक समजून दिव्यांगजणांनी चांगले कार्य  करण्याची प्रेरणा घ्यावी असे आवाहन नागपूरचे पालकमंत्री  आणि राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज नागपुरात केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाच्या  दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नागपूर जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रातर्फे दिव्यांग व्यक्तींकरिता सहाय्यकारी साहित्याचा  वितरण  कार्यक्रम आज त्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर, राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी, जिल्हा परिषद समाजकल्याण अ‍धिकारी  बाबासाहेब देशमुख, दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक अभिजित राऊत तसेच  कंपोझिट रिजिनल सेंटर-सीआरसीचे संचालक प्रफुल्ल शिंदे उपस्थित होते. 

केंद्र सरकारच्या दिव्यांगाना कृत्रिम अवयव आणि साहित्य साधने यांचे वितरण करण्याच्या योजना- एडीआयपी या योजनेअंतर्गत ब्रेल  कीट्स्‌, डीजी प्लेयर स्मार्टफोनचे वितरण पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते दिव्यांग युवक-युवतींना करण्यात आलं.  

जिल्हाधिकारी विमला आर यांनी याप्रसंगी केंद्र शासनातर्फे होणाऱ्या या साहित्याच्या वितरणाबाबत राष्ट्रीय दृष्टी दिव्यांगजन सशक्तिकरण संस्था देहरादून यांचे विशेष सहाय्य प्राप्त झाले असल्याचे स्पष्ट केले.  नागपूर विभागातील पाच हजार दिव्यांगाना यूडीआयडी कार्ड चा वितरणावर भर देऊन त्यांना या योजनांचा लाभ देण्यासाठी आपण लक्ष घालू. दिव्यांगांना कौशल्य आधारित प्रशिक्षणातून रोजगार प्राप्त होत आहे, असेही त्यांनी सांगितलं. 

यावेळी  राष्ट्रीय अनुसूचित जाती  आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे राबविण्यात आलेल्या या योजनांबद्दल समाधान व्यक्त केलं.  

कार्यक्रमाच्या प्रारंभी  थोर लेखिका हेलन केलर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले.  या कार्यक्रमाच संचालन दिनेश मासोदकर तर  आभार प्रदर्शन  सीआरसी चे संचालक  प्रफुल्ल  शिंदे यांनी केले.  या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा  अपंग पुनर्वसन  केंद्र तसेच  सी आर सी चे अधिकारी , कर्मचारी   मोठ्या संख्येने  दिव्यांग बांधव उपस्थित होते

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!