बंदुकीच्या धाकावर सराफा दुकान लुटण्याचा दरोडेखोरांचा प्रयत्न फसला; घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद

नागपूर,

जिल्ह्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असलेल्या पिपळा डाक बंगला येथील तुलसी सोनी नामक ज्वेलर्सच्या दुकानात तीन दरोडेखोरांनी बंदुकीच्या धकावर लूटमार करण्याचा प्रयत्न केला. मात्र दुकान मालकाने दाखवलेल्या समयसूचकतेमुळे दरोडेखोरांचा बेत फसल्याने त्यांना काढता पाय घेत पळून जावे लागले आहे. या संपूर्ण घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला असून त्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

वेळ रात्री साडे आठ दरम्यानची असेल, ज्यावेळी तुलसी सोनी ज्वेलर्स शॉपचे मालक राममिलन सोनी आपल्या पत्नी सीमासह दुकानात बसले असताना तीन दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केला. सुरुवातीला ते तिघे ग-ाहक असल्याचं त्यांना वाटलं, मात्र दुकानात प्रवेश करताच एकाने दुकानाचे शटर आतून बंद करताच दुकान मालकांना हा घातपाताचा प्रकार असल्याचे लक्षात येताच राममिलन सोनी आणि त्यांची पत्नी आतील खोलीत पळाले. तो पर्यंत दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश करून त्यांच्या दिशेने बंदूक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र सुदैवाने सोनी दाम्पत्याने सुरक्षितरित्या आतील खोलीत गेले होते. त्यांनी आरडाओरडा सुरू करताच तीनही दरोडेखोरांनी पळून जाण्यातच धन्यता मानली. केवळ एका मिनिटाच्या अंतरात घडलेल्या या घटनेचा थरार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे. घटनेची माहिती समजताच खापरखेडा पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झालेले तीनही आरोपी 20 ते 25 वयोगटातील आहेत. महत्वाचं म्हणजे खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वलनी, सिल्लेवाडा आणि चनकापुर या भागात गुन्हेगारांचा वावर मोठ्या प्रमाणात आहेत. स्थानिक गुन्हेगारांचा यामध्ये सहभाग नाकारता येत नसल्याने पोलिसांनी त्याअनुषंगाने तपास सुरू केला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!