भर वस्तीत पोलिसांनी केली मारहाण; अपमान जिव्हारी लागल्यानं तरुणानं दिला जीव, नागपूरातील घटना
नागपूर प्रतिनिधी
3 ऑगस्ट
काही दिवसांपूर्वी नागपुरात हेल्मेट न घातल्यानं पोलिसांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा दुर्दैर्वी मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना अशीच एक घटना नागपूरात पुन्हा उघडकीस आली आहे. पोलिसांनी वस्तीत जाऊन सर्वांसमोर मारहाण केल्यानं एका तरुणानं आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा अपमान जिव्हारी लागल्यानेच तरुणानं आत्महत्या केली असल्याचा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला आहे.
महेश राऊत असं आत्महत्या करणार्या 35 वर्षीय तरुणाचं नाव असून तो नागपूरातील हुडकेश्वर परिसरातील रहिवासी आहे. सोमवारी नागपूर पोलिसांनी पीडित तरुणाच्या वस्तीत जाऊन सर्वांसमोर त्याला मारहाण केली होती. सर्वांसमोर झालेला अपमान जिव्हारी लागल्यानं महेश यानं हे टोकाचं पाऊल उचललं आहे. महेशच्या आत्महत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मृत महेश राऊत यांच्या नातेवाईकांनी हुडकेश्वर पोलिसांत धाव घेत संबंधित आरोपी पोलीस कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
मृत महेश राऊत यानं काल 100 नंबरवर फोन करून एका मनोरुग्ण तरुणाला मारहाण होत असल्याची माहिती पोलीस कन्ट्रोल रुमला कळवली होती. पण यानंतर पोलिसांनी अधिक माहितीसाठी महेशला फोन केला. पण महेशनं पोलिसांचा फोन उचलला नाही. त्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी महेश राहत असलेल्या परिसरात येऊन त्याला भर वस्तीत मारहाण केली.
परिसरातील ओळखीच्या लोकांमध्ये मारहाण झाल्याचा अपमान जिव्हारी लागलेल्या महेशनं गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तसेच मृत महेशच्या कुटुंबीयांकडून संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.