महापुरुषांच्या चरित्र वाचनातून उद्याची पिढी सक्षम घडेल – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समित्यांची बैठक संपन्न

मुंबई, दि. 31 : महापुरुषांच्या चरित्र वाचनातून उद्याची पिढी सक्षम घडणार असल्याने महापुरुषांच्या चरित्र साधने समित्यांनी अतिशय वेगाने काम करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष उदय सामंत यांनी दिले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समिती, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समिती, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समिती यांच्या स्वतंत्र बैठका उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली  झाल्या. यावेळी ते बोलत होते.

शासनाने विविध चरित्र साधने समित्यांचे पुनर्गठन केल्यानंतर शासनाने संबंधित समित्यांच्या बैठकांचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये त्या-त्या चरित्र साधने समित्यांच्या सदस्य सचिवांनी प्रकाशन समित्यांचा आजवर केलेल्या कामांचा अहवाल मांडला आणि पुढील वर्षभरामध्ये हाती घ्यावयाच्या उपक्रमांची माहिती दिली.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशनातील सहाव्या खंडाचे प्रकाशन लवकर करून ते लोकांसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध नसलेले आणि लोकांची मागणी असलेले सर्व खंड तातडीने आणि मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिले जावेत, अशा सूचना करून यासाठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.सामंत यांनी सांगितले.

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे चरित्र खंड 3 आणि खंड 4 चे नवीन प्रकाशन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला आहे. खंड 1 आणि 2 चे पुनर्मुद्रण करावे अशी सूचना  यावेळी श्री.सामंत यांनी केली. चरित्राच्या खंडाचे प्रकाशन संबंधित महापुरुषांच्या जन्मस्थानी आणि त्यांच्या कर्मभूमीत व्हावे, असेही श्री.सामंत यांनी सांगितले.

लोकमान्य टिळक यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकणाऱ्या साहित्याची निर्मिती करून सध्या टिळकांच्या वंशजांकडे उपलब्ध असलेल्या साधनांचे प्रकाशन करावे. अशा प्रकारचे सर्व साहित्य मुंबईतील अभिलेखांगारांमध्ये उपलब्ध असेल त्यासाठी गृह विभागाकडून आवश्यक त्या सर्व परवानग्या शासन तातडीने घेऊन देईल. राज्यात व राज्याबाहेर संसाधनांचा शोध घेण्यासाठी सोयीचे जावे यासाठी सर्व समित्यांचे सदस्य सचिव आणि सदस्य यांना तातडीने नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देण्यात यावीत, असे निर्देश श्री.सामंत यांनी यावेळी दिले.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, कोविड-19 ची स्थिती आटोक्यात आल्यानंतर राज्यातील महाविद्यालयांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, लोकमान्य टिळक तसेच इतर महापुरूषांच्या नावाने अभ्यासमंडळे स्थापन करण्यात येतील.

सर्व चरित्र साधने प्रकाशन समित्यांची प्रकाशने नामांकित ऑनलाईन कंपन्यांच्या माध्यमातूनही उपलब्ध करून देऊन ही पुस्तके ऑनलाईन स्वरूपात अधिक सुलभ पद्धतीने सामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावीत. आयएसबीएन क्रमांक मिळण्यासाठी आणि सर्व समित्यांची ऑनलाईन पोर्टल तयार करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत.

या बैठकीस डॉ.दीपक टिळक, डॉ.भालचंद्र मुणगेकर, प्रा.राजा दीक्षित, डॉ.प्रकाश बच्छाव, प्रा.अरविंद गणाचारी, प्रा.बळीराम गायकवाड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे सदस्य सचिव डॉ. प्रदीप आगलावे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव मल्लिका अमर शेख, लोकमान्य टिळक चरित्र साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिव डॉ.श्रद्धा कुंभोजकर आदी मान्यवर उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!