पंतप्रधान आवास योजनेतुन तळीये गावात दरड कोसळल्याने बाधित झालेल्यांचे पुनर्वसन करणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे
केंद्राच्या विविध योजनांचा आधार घेऊन रत्नागिरीतील व्यापाऱ्यांना मदत केली जाईल: नारायण राणे
मुंबई, 25 जुलै 2021
एकाही आपत्तीग्रस्ताला बेघर राहू देणार नाही आणि दरड कोसळल्याने बाधित झालेल्या सर्वांना पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधून दिले जाईल असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तळीये येथे जाहीर केले. या वेळी महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रविण दरेकर, जिल्हाधिकारी निधी चौधरी उपस्थित होते.
आज सकाळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दरड कोसळल्याने बाधित तळीये गावाची पहाणी केली. ग्रामस्थांना आणि मृतांच्या नातेवाईकांना दिलासा देत नारायण राणे यांनी राज्य सरकार आणि केंद्र सरकार यथोचित मदत करेल तसेच प्रत्येक आपत्तीग्रस्ताचे पुनर्वसन केले जाईल असे सांगितले.
नारायण राणे यांनी पूरग्रस्त चिपळूण शहरात देखील पाहणी करून नुकसानग्रस्तांशी चर्चा केली. यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, अतिवृष्टीमुळे आणि आलेल्या पुरामुळे चिपळूणमध्ये बाजारपेठेत पाणी घुसले. व्यापाऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. म्हणून पंतप्रधानांच्या निर्देशानुसार मी कोकणात पाहणी करून त्यासंदर्भात अहवाल देणार आहे.
विम्याचे पैसे अॅडव्हान्स द्यावेत, नुकसान भरपाई द्यावी आणि घरांचे पुनर्वसन व्हावे अशा व्यापाऱ्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. केंद्राच्या विविध योजनांचा आधार घेऊन व्यापाऱ्यांना मदत केली जाईल असे राणे म्हणाले.