पूर परिस्थितीत मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली
• नौदल, सैन्यदलाच्या तुकड्याही बचावकार्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने संपर्कात
मुंबई, दि.२२ : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.
एनडीआरएफच्या २ तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल
कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी २५ जवानांची २ पथके सज्ज झाली आहेत.