वरळी परिसरातील लसीकरण शिबिरांना मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट; विकास आणि सौंदर्यीकरणाच्या कामांचाही घेतला आढावा

मुंबई, दि. 17- मुंबईत विविध ठिकाणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. वरळी परिसरातील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (एनएससीआय), डॉ.बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि अंबामाता मंदिर, जाम्बोरी मैदान येथे आयोजित लसीकरण शिबिरांना श्री ठाकरे यांनी आज भेट दिली आणि लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला.

एन.एस.सी.आय. येथे आदित्य बिर्ला ग्रुपच्या सौजन्याने महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांसाठी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा आणि जाम्बोरी मैदान येथे आरपीजी फाऊंडेशन आणि सुराणा ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या सौजन्याने बीडीडी चाळ आणि परिसरातील रहिवाशांसाठी प्रत्येकी एक हजार लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्री ठाकरे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना लसींच्या उपलब्धतेनुसार जास्तीत जास्त लसीकरण करण्याचा शासनाचा प्रयत्न असून यासाठी वैद्यकीय पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचे सांगितले. लसीकरणासाठी नागरिकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. लसीकरणासाठी साहाय्य करणाऱ्या सामाजिक संस्था, हॉस्पिटल्स, वैद्यकीय पथकांचे त्यांनी आभार मानले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, माजी मंत्री सचिन अहिर, महापालिकेचे सहायक आयुक्त शरद उघडे तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

सर्वेक्षण आणि मॅपिंगसाठीच्या ड्रोन चे उदघाटन

महानगरपालिकेच्या जी दक्षिण विभागामार्फत सर्वेक्षण, मॅपिंग, सॅनिटायझेशन अशा विविध कामांसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोनचे उदघाटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

पोलीस वसाहतीतील विकास कामांचा आढावा

पोलिसांसाठी पायाभूत सुविधांचा विकास, कवायतीसाठी जागा व सुशोभीकरणाच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याबाबत श्री ठाकरे यांनी वरळी येथील सफेद मैदानास भेट दिली. येथील पोलीस वसाहतीच्या दुरूस्ती कामाचाही त्यांनी आढावा घेतला. जवळच असलेल्या नरेश पाटील चौकाच्या सौंदर्यीकरणाचे काम त्वरित हाती घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!