फुकटात फरसाण दिले नाही म्हणून पोलीस अधिकार्याची मारहाण, मुलुंडमधील दुकानदाराचा आरोप
मुंबई प्रतिनिधी
15 जुलै
एका पोलीस अधिकार्याने दुकानदाराला बेदम मारहाण केल्याची घटना मुलुंडमध्ये समोर आली आहे. फुकटात फरसाण दिले नाही म्हणून पोलीस अधिकार्याने बेदम मारल्याचा आरोप दुकान मालकाने केला आहे. सचिन पाटील असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
मुलुंडच्या इंद्रप्रस्थ विभागात ही घटना घडली आहे. रविवारच्या वेळी संध्याकाळच्या सुमारास फरसाणचे दुकान अर्धवट उघडे असताना त्या ठिकाणी मुलुंड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील पोहोचले. त्यांनी दुकानात काम करणार्या कामगारांना दुकान का उघडे ठेवले असे विचारले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याला थेट पोलीस स्टेशनमध्ये नेऊन त्या ठिकाणीदेखील त्याला बेदम चोप दिला.
या घटनेमध्ये दुकानात काम करणार्या कामगाराच्या कानाला दुखापत झाली आहे. प्रकाश चौधरी असे मारहाण झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. दरम्यान या घटनेसंदर्भात परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांच्याकडे दुकानाच्या मालकाकडून पोलीस अधिकारी सचिन पाटील यांच्याविरोधात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
या दुकानाचे मालक सुनील चौधरी यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन पाटील यांच्या विरुद्ध केलेल्या तक्रारीत म्हटलं की, काही दिवसांपूर्वी साडेचार हजार रुपयांचं फरसाण सचिन पाटील यांनी आपल्याकडे मागितलं होतं. मात्र त्यांना मी ते फरसाण फुकटात दिलं नाही. याचा राग मनात ठेऊन वीकेंड लॉकडाऊनचे कारण काढत दुकानात घुसून ठरवून त्यांनी आपल्या कर्मचार्याला मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. याबाबत मुलुंड पोलिसांनी मात्र प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली आहे.