BMCचा मोठा निर्णय, तूर्तास ऑॅनलाईन विवाह नोंदणी बंद
मुंबई प्रतिनिधी
15 जुलै
कोरोनाच्या काळात लग्न सोहळ्यावर निर्बंध घालण्यात आले होते. पण, आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे लग्न सोहळ्यांना परवानगी देण्यात आली आहे. आता मुंबईत ऑॅनलाईन विवाह नोंदणी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ऑॅफलाईन पद्धतीने नोंदणी सुरू करण्यात आली आहे. संगणकीय प्रणाली अद्ययावत करण्यात येत असल्याने अल्प कालावधीसाठी बदल करण्यात आले आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध नागरी सेवा-सुविधांविषयीची कार्यवाही ही गेल्या काही वर्षांपासून संगणकीय प्रणालीद्वारे व ऑॅनलाईन पद्धतीने अत्यंत सक्षमपणे सातत्याने करण्यात येत आहे. या अनुषंगाने संगणकीय प्रणालीचे अद्ययावतीकरण व सक्षमीकरण गरजेचे असल्याने महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान खात्याद्वारे सध्या याबाबतची कार्यवाही करण्यात येत आहे.
या अद्ययावतीकरणाच्या अंमलबजावणीकरीता संबंधीत संगणकीय प्रणालीचे कामकाज दिनांक 21 जुलै 2021 पर्यंत बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या काही सेवा-सुविधांविषयीची कार्यवाही अल्प कालावधीसाठी ऑॅफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे.
या अंतर्गत ऑॅनलाईन पद्धतीने होणारे विवाह नोंदणीचे कामकाज देखील बंद राहणार असून यामुळे पर्यायी स्वरुपात विवाह नोंदणी विषयक कार्यवाही ही ऑॅफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
संगणकीय प्रणाली पूर्ववत होईपर्यंत महापालिकेच्या सर्व 24 विभागांमधील विवाह निबंधकाकडे ऑॅफलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील आणि मुलाखतीची तारीख व वेळ देण्यात येईल. विवाह नोंदणी प्रमाणपत्र संबंधीत संगणकीय प्रणालीच्या अद्ययावतीकरणाचे काम झाल्यानंतर प्रचलित पद्धतीने ऑॅनलाईन अर्ज केल्यावर प्राप्त होईल. याबाबत अधिक माहितीसाठी विभागातील विवाह निबंधकाकडे संपर्क साधावा आणि महानगरपालिका प्रशासनास योग्य ते सहकार्य करावे, असंही आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात येत आहे.