सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीत आजपासून वाढ
मुंबई प्रतिनिधी
14 जुलै
हल्ली ब्रँडेड चारचाकी वाहनांमध्येही इंधन दरवाढीला पर्याय म्हणून सीएनजी बसवण्यात येतो. पण आता पेट्रोल आणि डिझेल दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पीएनजी गॅसच्या किमतीतही आजपासून वाढ करण्यात आली आहे. महानगर गॅस लिमिटेड या इंधन पुरवठादार कंपनीने आज मध्यरात्रीपासून मुंबईत सीएनजीच्या किमतीत प्रतिकिलो 2 रुपये 58 पैशांची वाढ केल्यामुळे आधीच पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे हैराण झालेल्या सामान्य जनतेला या सिलेंडरच्या किंमती वाढीमुळे धक्का बसला आहे. मुंबईकरांना याचा मोठा फटका बसला आहे.
वाहतूक आणि अन्य खर्चात वाढ झाल्यामुळे ही दरवाढ लागू करण्यात आल्याचे महानगर गॅसकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता मुंबईतील सीएनजीवर चालणार्या वाहनांच्या भाड्यातही वाढ होऊ शकते. या दरवाढीने मुंबईतील रिक्षाचालक आणि टॅक्सी चालकांना मोठा फटका बसणार आहे. तर दुसरीकडे घरगुती सिलेंडरच्या दरात वाढ झाल्यामुळे सामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. पाईप गॅसच्या दरात प्रती युनिट 55 पैसे वाढ करण्यात येणार आहे.
सध्या पेट्रोल, डिझेल आणि घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या तुलनेत सीएनजीचे दर स्वस्त आहे. मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव 107.20 रुपये आहे. तर डिझेलचा भाव 97.21 रुपये आहे. पेट्रोलच्या तुलनेत सीएनजी 67 टक्क्यांनी स्वस्त आहे. तर डिझेलच्या तुलनेत सीएनजी 47 टक्क्यांनी स्वस्त आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या सीएनजी पाईप गॅस 35 टक्क्यांनी स्वस्त असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
पट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत दररोज वाढ होत आहेत. महाराष्ट्रात पेट्रोलच्या दरांनी शंभरी पार केली असून डिझेलचे दरही शंभरीच्या दिशेने वाटचाल करत असल्यामुळे इंधन दरवाढीनंतर सीएनजी दरवाढीनंही सर्वसामान्यांचा खिसा हलका होणार आहे. इंधन दरवाढीबाबत सरकारने आधीच हात वर केले आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील वाढलेल्या किंमतीमुळे होत असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.