राज्यात सोयाबीन पिकाची ९९ टक्के तर कापसाची ८१ टक्के क्षेत्रावर पेरणी – कृषिमंत्री दादाजी भुसे

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागासाठी उद्या अंतिम मुदत

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेतील प्रकरणांचा निपटारा १० ऑगस्टपर्यंत करा

मुंबई प्रतिनिधी

दि. 14 : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत खरीप 2021साठी आतापर्यंत 37 लाख 23 हजार शेतकऱ्यांनी अर्ज केले असून उद्या दिनांक 15 जुलै ही योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम मुदत असल्याचे कृषिमंत्री  दादाजी भुसे यांनी सांगितले. दरम्यान राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे पेरण्यांना वेग आला असून प्रमुख पिकांच्या पेरणीमध्ये सोयाबीन 99 टक्के तर कापूस पिकाची 81 टक्के पेरणी झाल्याचे कृषिमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात पावसाला सुरुवात झाली असून 304 तालुक्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्केपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. तर 34 तालुक्यांमध्ये 50 ते 75 टक्के, 14 तालुक्यांमध्ये (नाशिक व नंदुरबार जिल्ह्यातील) 25 ते 50 टक्के तर सुरगाणा आणि नवापूर या दोन तालुक्यांमध्ये सरासरीच्या 25 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

राज्यात आजपर्यंत 74 टक्के पेरणी झाली असून त्यामध्ये सोयाबीनची पेरणी 99 टक्के झाली आहे. सोयाबीनचे सरासरी क्षेत्र 39 लाख हेक्टर असून 38 लाख हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. राज्यात कापूस लागवडीचे सरासरी क्षेत्र 42 लाख हेक्टर असून त्यापैकी 39 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भात पिकाची लागवड सुरु असून सरासरी क्षेत्राइतकी पेरणी होईल असा अंदाज वर्तविण्यात आला असल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले. राज्यातील चार जिल्ह्यामध्ये तुलनेने पेरणी कमी झाली असून त्यामध्ये नाशिक 32 टक्के, धुळे 44 टक्के, नंदुरबार 39 टक्के तर गोंदिया 9 टक्के इतकी पेरणी झाली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!