नाराज समर्थकांच्या भेटीसाठी पंकजा मुंडे वरळी कार्यालयात दाखल
मुंबई प्रतिनिधी
13 जुलै
खासदार प्रीतम मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने नाराज झालेले मुंडे समर्थक पंकजा मुंडेंची भेट घेण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. तर पंकजा मुंडेही मुंबईतील वरळी येथील कार्यालयात दाखल झाल्या आहेत. या समर्थकांची भेट घेण्यासाठी पंकजा मुंडे दिल्लीहून मुंबईला परतल्या आहेत. त्या दोन दिवसांपासून दिल्ली दौर्यावर होत्या.
मराठवाड्यातील बीडसह नाशिक, बुलडाणा या जिल्ह्यातील सुमारे एक हजार पदाधिकारी आणि मुंडे समर्थक वरळी कार्यालयात जमले आहेत. समर्थकांना भेटण्यासाठी पंकजा मुंडे या दिल्लीतून मुंबईत आल्या आहेत. दोन दिवसीय दिल्ली दौर्याहून परतल्यानंतर पंकजा मुंडे काय आदेश देणार याकडे समर्थकांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे या नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होत्या. मात्र आपण नाराज नसल्याचं पंकजा मुंडे यांनी 8 जुलैला पत्रकार परिषद घेऊन सांगितले होतं. तसेच मुंडे कुटुंबीयांनी कधीही कोणाकडे कोणतंही पद मागितलं नाही, असंही त्या म्हणाल्या होत्या.
7 जुलैला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात प्रीतम मुंडे यांना स्थान मिळाले नाही. त्यामुळे मुंडे समर्थक मोठ्या प्रमाणात नाराज झाले आहेत. त्यामुळे बीडमधील जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असलेल्या मुंडे समर्थकांनी राजीनामे देणे सुरू केले. आतापर्यंत जवळपास 105 पदाधिकार्यांचे राजीनामे दिल्याने भारतीय जनता पक्षात चिंतेचे वातावरण तयार झाले आहे.