दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत

विधानसभा उपाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत निर्देश

दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत

मुंबई प्रतिनिधी

दि. 07 : दमणगंगा, एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामे त्वरीत सुरु करावीत, असे निर्देश आज विधानसभा उपाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपाध्यक्षांनी योजनेसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक बाबीबद्दल काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचविल्या. ज्यामुळे या प्रकल्पाची किंमत कमी होऊ शकेल असे त्यांनी सांगितले. त्यासंदर्भात विभागाने प्रशासकीय मान्यता व इतर बाबींकरीता प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे निर्देश मंत्री जयंत पाटील यांनी दिले. या प्रकल्पामुळे दुष्काळी भागातील पाणीप्रश्न काही प्रमाणात सुटू शकेल. तसेच सिंचनात‍ वाढ होईल असेही जलसंपदामंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी विभागाच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. याचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) हा राष्ट्रीय जलविकास अभिकरण (एनडब्ल्युडीए) नवी दिल्ली यांच्यामार्फत तयार करण्यात येत असून हे काम प्रगतीपथावर आहे. सप्टेंबर 2021 अखेर अहवाल जलसंपदा विभागास सादर होऊ शकेल, अशी माहिती अधीक्षक अभियंता अ.रा.नाईक यांनी दिली.

यावेळी जलसंपदा विभागाचे सचिव (प्रकल्प समन्वय) ए.एन.मुंडे, मुख्य अभियंता नाशिक प्रादेशिक विभाग, डॉ.संजय बेलसरे, कार्यकारी अभियंता सचिन पाटील व इतर अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!