शेतकऱ्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप

मुंबई, दि. 01 : शेतकरी महाराष्ट्राचे वैभव असून त्यांच्या हिताला धक्का पोहोचेल असे निर्णय घेणार नाही. राज्याचे हे हरित वैभव वाढण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले.

कृषी विभागातर्फे राबविण्यात आलेल्या कृषी संजीवनी मोहिमेचा समारोप झाला. यावेळी नाशिक येथून दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार सहभागी झाले होते. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, फलोत्पादन राज्यमंत्री कु.आदिती तटकरे हे सह्याद्री अतिथीगृह येथे उपस्थित होते.

कृषीदिनानिमित्त माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कृषीदिनानिमित्त शुभेच्छा देतानाच आज राष्ट्रीय डॉक्टर दिन आहे याचा उल्लेख करत कोरोना काळात शेतकरी आणि डॉक्टर यांनी केलेल्या कामाचे कौतुक करताना हे दोन्ही अन्नदाते आणि जीवनदाते असल्याचे गौरवोद्‌गार मुख्यमंत्र्यांनी काढले.

शेतकरी राज्याचे वैभव

मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी राजा राज्याचे वैभव असून ते जपण्याचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून केले जात आहे. शेती व्यवसायातील अनिश्चितता लक्षात घेऊन त्यात धाडसाने पाऊल टाकणाऱ्या बळीराजाला ताकद देण्याचे काम राज्य शासन करीत आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात दुष्काळ, पूर, गारपीट, कोरोना असे संकट आले, मात्र शेतकरी डगमगला नाही. सोन्यासारखे पिक नैसर्गिक आपत्तीत उद्धवस्त होत असते अशा वेळी शासन म्हणून पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम आम्ही करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन कामकाजाची सुरुवात

आमचे सरकार आल्यानंतर त्याच्या कामकाजाची सुरुवात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन केली. कोरानाच्या संकटाला दीड वर्षापासून राज्य तोंड देत आहे. मात्र या काळात शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेत जे योगदान दिले आहे ते विसरता येण्यासारखे नाही, असे सांगतांनाच उद्योगाप्रमाणे शेतीतही नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करुन दर्जोन्नती केली पाहिजे. त्यासाठी राज्य शासनाने विकेल ते पिकेल ही योजना सुरु केली. शेतकरी जे पिकवेल ते विकले गेले पाहिजे. त्याला हमी भाव नाही तर हमखास भाव मिळाला पाहिजे, अशी आमची भूमिका असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले.

हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईकांची परंपरा पुढे नेत असतानाच राज्यातील शेतकरी हिताला धक्का लागेल अशी एकही बा‍ब राज्यात होऊ देणार नाही. असे सांगतांनाच शेतकऱ्यांनी प्रयोगशिलता जपली पाहिजे. मर्यादित स्वरुपात प्रयोग करीत राहिले पाहिजे. त्या प्रयत्नांना बळ देण्याचे काम एकत्रितपणे केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कृषी प्रक्रिया उद्योगाला चालना-उपमुख्यमंत्री

शेतकऱ्यांच्या पारंपरिक ज्ञानाला आणि अनुभवाला तंत्रज्ञानाचा जोड मिळाल्यास त्याचा नक्की फायदा होईल. कृषी संजीवनी मोहिमेच्या माध्यमातून त्याला सुरुवात झाल्याचे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी सांगितले. राज्यात कृषी मालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून पिकांचे उत्पादकता, गुणवत्ता आणि तंत्रज्ञान या त्रिसूत्रीचा वापर करीत कृषी विभागाचे काम चांगल्या पद्धतीने सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रयोगशील शेतकरी हे स्वतंत्र विद्यापीठ – महसूल मंत्री

प्रयोगशिल शेतकरी हे स्वतंत्र विद्यापीठ असल्याचे महसूल मंत्री श्री. थोरात यांनी सांगितले. उत्पादकता वाढल्यास शेती परवडणारी होऊ शकते. शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करणारे कृषीमंत्री दादाजी भुसेंच्या माध्यमातून लाभले असून ते मनापासून काम करीत असल्याचे मंत्री श्री. थोरात यांनी यावेळी सांगितले. पिक स्पर्धा विजेत्या शेतकऱ्यांचे अनुभव शब्दबद्ध आणि चित्रीत करुन ते राज्यातील अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.

मोहिमेत 7 लाख शेतकऱ्यांचा सहभाग – कृषीमंत्री

राज्यात दरवर्षी कृषीसंजीवनी मोहीम कृषी दिनापासून आयोजित केली जाते. यावर्षी मात्र कृषीदिनाच्या आठवडाभर ही मोहीम राबवून खरिपासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. शेकडो शास्त्रज्ञ, कृषी अधिकारी, लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मार्गदर्शन केले. या मोहिमेत 7 लाख शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असून मोहीम काळात प्रत्येक दिवशी वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आल्याचे कृषीमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले. राज्यात कृषी मालावर प्रक्रिया करण्यासाठी विविध योजना एकाच छताखाली आणून प्रक्रिया उद्योगाला चालना देण्याकरीता अन्न प्रक्रिया संचालनालयाची निर्मिती, कृषीमाल विक्री व्यवस्था बळकट करणे, बियाण्यांबाबत महाराष्ट्राला गतवैभव प्राप्त करुन देणे यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी अन्न देवता असल्याचा उल्लेख कृषीमंत्र्यांनी यावेळी केला.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

यावेळी रब्बी हंगाम 2020 मधील पिक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. साहेबराव चिकणे, सातारा, सुहास बर्वे, सिन्नर, वसंत कचरे, खटाव, राजेश हाळदे, देगलुर, आट्या पाडवी, तळोजा, विठ्ठल आवारी, ईगतपुरी, हिराचंद गावीत, कळवण या विजेत्या शेतकऱ्यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्याची भेट मुख्यमंत्र्यांनी देण्यात आली.

यावेळी कृषी राज्यमंत्री डॉ.कदम यांनी आभार मानले. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, पोक्रा प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक विकास रस्तोगी, कृषी संचालक विकास पाटील यांच्यासह कृषी अधिकारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!