राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची मुंबई विद्यापीठाला भेट
विद्यापीठातील इमारतींना यथाशीघ्र ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबद्दल सूचना
मुंबई प्रतिनिधी
दि. 30 : मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या इमारती बांधून पूर्ण आहेत. मात्र ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय त्या पडून आहेत. या इमारतींमधील त्रुटी दूर करून विद्यापीठाला इमारतींच्या वापराबाबत ना हरकत व भोगवटा प्रमाणपत्र यथाशीघ्र देण्याच्या सूचना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महानगरपालिका व अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला भेट दिली व विविध विभाग व इमारतींची पाहणी केली. त्यानंतर विद्यापीठातील अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी वरील सूचना दिल्या.
विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत उपयोगात नसलेल्या इमारती याबाबतदेखील सविस्तर माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी विद्यापीठाला दिल्या. विद्यापीठाच्या ३८ इमारती महानगरपालिका व अग्निशमन विभागाच्या ना हरकत व भोगवटा प्रमाणपत्राशिवाय पडून आहेत याबाबत राज्यपालांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.
यावेळी कलिना परिसर येथे मुंबई विद्यापीठातर्फे सुरु असलेले नवीन परीक्षा भवन, ग्रंथालय भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह व नवे मुलींचे वसतिगृह व भावी योजना याबाबत सादरीकरण करण्यात आले.
राज्यपालांनी यावेळी डॉ. आंबेडकर भवन, नॅनो सायन्स व नॅनो टेक्नॉलॉजी केंद्र, इन्क्युबेशन फॉर डेव्हलपिंग आंत्रप्रेन्युअरशिप अँड स्टार्ट अप केंद्र, हरित तंत्रज्ञान भवन, स्कूल ऑफ बेसिक सायन्सेस, नवे परीक्षा भवन व जवाहरलाल नेहरू ग्रंथालय येथे भेट दिली तसेच प्रयोगशाळा व ग्रंथालयाची पाहणी केली.
कुलगुरू डॉ.पेडणेकर यांनी राज्यपालांचे विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरची प्रतिकृती भेट देऊन स्वागत केले. बैठकीला प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिसभेचे सदस्य उपस्थित होते.