कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करत मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपहारगृह सुरू करा

 सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे निर्देश

मुंबई प्रतिनिधी

दि. 29 : कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा अवलंब करून मंत्रालयातील महिला बचत गटाचे उपहारगृह सुरू करावे तसेच या ठिकाणी केवळ अन्नपदार्थ घेऊन जाण्याची (टेक अवे) सुविधा देण्यात यावी, असे निर्देश सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी प्रशासनाला दिले.

राज्यमंत्री श्री. भरणे यांच्या अध्यक्षतेखाली महिला बचत गटाचे उपहारगृह सुरू करण्याबाबत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सोमनाथ बागुल, मंत्रालय सुरक्षाचे सहायक पोलीस आयुक्त मधुकर जवळकर, मंत्रालय सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अशोक गायकवाड, गृह विभागाचे कक्ष अधिकारी बाबासाहेब खंदारे उपस्थित होते.

कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच ‘टेक अवे’ या तत्वावर उपहारगृह सुरू करण्याच्या सूचना श्री. भरणे यांनी यावेळी दिल्या. या निर्णयामुळे मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि कामानिमित्त मंत्रालयात येणाऱ्या अभ्यागतांची अल्पोपहाराची सोय होण्यास मदत होणार आहे.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांतर्गत मंत्रालयातील महिला उपहारगृह बंद होते. या महिलांचा रोजगार सुरू रहावा या दृष्टिकोनातून सहानुभूतीने निर्णय घेणे आवश्यक असून त्यासोबतच कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचेही काटेकोर पालन होणे गरजेचे आहे, असेही राज्यमंत्री श्री. भरणे यावेळी म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!