राजर्षी शाहू महाराजांचे सामाजिक न्यायाचे विचार सदैव मार्गदर्शक; राजर्षींच्या विचारांवरच राज्याची वाटचाल सुरु असल्याचा अभिमान — उपमुख्यमंत्री अजित पवार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्र्यांचे विनम्र अभिवादन; सामाजिक न्यायदिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

मुंबई दि. 26 :- राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे शेतकऱ्यांचे तारणकर्ते, बहुजनांचे पालनकर्ते होते. आपल्या संस्थानात त्यांनी शेतकरी हिताचे कायदे केले. शेतीसाठी धरणं बांधली. बहुजनांच्या मुलांना शिक्षणाची दारं खुली करुन दिली. त्यांच्यासाठी वसतीगृहे बांधली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. नोकरीमध्ये आरक्षण दिलं. महिलांच्या सक्षमीकरणाचे कायदे केले. सामाजिक सुधारणा करून सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. सामाजिक न्यायाचे प्रणेते, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सर्वकालिन आदर्श राजे होते. त्यांचे सामाजिक न्यायाचे विचार मार्गदर्शक असून त्या विचारांवरच राज्याची आजही वाटचाल सुरु आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन त्यांना आदरांजली वाहिली. उपमुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती आणि सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, राजर्षी शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा रयतेच्या कल्याणाचा वसा व वारसा समर्थपणे पुढे नेला. उपेक्षित, वंचित घटकांना मानसिक गुलामगिरीतून बाहेर काढण्यासाठी सामाजिक न्यायाचा क्रांतिकारक विचार दिला. बहुजन समाजातील मुलांसाठी वसतिगृहे सुरु केली. शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी धरणे बांधली. बहुजनांना शिक्षण, जातिभेद निर्मूलन, नोकऱ्यांमध्ये आरक्षण, स्त्रीमुक्तीसाठी कायदे करणारे राजर्षी शाहू महाराज हे देशातील थोर समाजसुधारक होते.  महात्मा ज्योतिबा फुले यांचा सत्यशोधक विचार त्यांनीच खऱ्या अर्थानं पुढे नेला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी मदत केली, त्यांना प्रोत्साहन दिले. बहिष्कृत बांधवांच्या हक्कासाठी ऐतिहासिक मानगाव परिषदेचं आयोजन केलं. अंधश्रद्धा निर्मुलन, अस्पृश्यता निवारणाचं काम केलं. अनिष्ट प्रथा, वाईट रुढी, चुकीच्या परंपरांवर बंदी घातली. आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देत, राज्यात त्यासंबंधीचा कायदा केला. सामाजिक न्यायाचे, आरक्षणाच्या संकल्पनेचे जनक असलेले राजर्षी शाहू महाराज यांच्या पुरोगामी, प्रगत, दूरदृष्टीपूर्ण विचारांमुळे राजर्षी शाहू महाराजांचे विचार आपल्यासाठी नेहमीच मार्गदर्शक, प्रेरणादायी आहेत, असे सांगत उपमुख्यमंत्र्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना विनम्र अभिवादन केले आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!