पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील
• पैठण तालुक्यासाठी वरदान ठरणार अनेक वर्षांपासूनची मागणी पूर्ण
मुंबई, दि. २३ : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. जल जीवन मिशन अंतर्गत नियमित निविदा प्रक्रियेद्वारे हे काम राबविण्यात येईल. या योजनेमुळे पैठणवासियांची तहान भागणार असून पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करणे शक्य होईल. पैठणकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी या निमित्ताने पूर्ण झाल्याचा विशेष आनंद आहे अशी भावना श्री.पाटील यांनी व्यक्त केली.
जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यास आणि त्यासाठी लागणाऱ्या २८५ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. याशिवाय औरंगाबाद जिल्ह्यातील इतर तालुके, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि उर्वरित पुढील टप्प्यांबाबत एकूण पाण्याची उपलब्धता व निधीच्या उपलब्धतेनुसार मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. त्याचप्रमाणे पश्चिम वाहिनी नद्यांमधून पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याबाबत जलसंपदा विभागाने अभ्यास अहवाल (सुसाध्यता) सादर करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
मराठवाडा विभागातील पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी पिण्याचा पाण्याची ग्रीड हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आता टप्प्या-टप्प्याने विकसित करण्यात येणार आहे. प्रथम औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यासाठी जायकवाडी धरणातून ग्रीड करण्यात येईल असेही पाणीपुरवठा मंत्री श्री.पाटील यांनी सांगितले.