राज्याच्या गावागावात क्रीडासंस्कृती पोहोचविण्याचा जागतिक ऑलिंपिक दिनाच्या निमित्तानं निर्धार – उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्याकडून जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा
मुंबई, दि. २२ :- “खेळ हे मानवी संस्कृतीचे अविभाज्य भाग आहेत. खेळ माणसाला सुसंस्कृत बनवतात, आनंदानं जगायला शिकवतात. खेळ माणसाला शरीरानं, मनानं तंदुरुस्त ठेवतात. एकता, समता, बंधुता, खिलाडूवृत्तीनं वागण्याची शिकवण खेळांमुळे मिळते. सुसंस्कृत, समर्थ, सशक्त समाज निर्माण करण्याची ताकद खेळांमध्ये असल्यानं महाराष्ट्राच्या शहरात, गावखेड्यात, वाडीवस्तीवर क्रीडासंस्कृती पोहोचली, रुजली, वाढली पाहिजे. असे झाले तरंच देशाला ऑलिंपिक पदक जिंकून देणारे खेळाडू महाराष्ट्रात मोठ्या संख्येन निर्माण होतील. महाराष्ट्राचं नाव उज्ज्वल करतील. त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करण्याचा निर्धार आज जागतिक ऑलिंपिक दिनी करुया” अशा शब्दात उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी राज्यातील जनतेला जागतिक ऑलिंपिक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, आज जागतिक ऑलिंपिक दिन साजरा करत असताना, १९५२ च्या हेलसिंकी ऑलिंपिकमध्ये देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक जिंकून देणाऱ्या पैलवान खाशाबा जाधव साहेबांची मला आठवण होते. पैलवान खाशाबा जाधवांच्या रुपानं देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिंपिक पदक महाराष्ट्रानं मिळवून दिलं होतं. ही बाब आनंदाची, अभिमानाची आहे. येत्या जुलै महिन्यात जपानमध्ये होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्रातून सात खेळाडू सहभागी होत आहेत. हे मोठे खेळाडू आहेत. त्यांनी मेहनत घेतली आहे. पदक जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करण्याची त्यांची जिद्द आहे. राज्य सरकार पूर्ण ताकदीनं या खेळाडूंच्या पाठीशी उभे आहे. महाराष्ट्राचे खेळाडू टोकियो ऑलिंपिकमध्ये उत्तम कामगिरी करुन देशासाठी पदक जिंकतील, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्र्यांनी टोकियो ऑलिंपिकमधील यशासाठी महाराष्ट्राच्या, देशाच्या ऑलिंपिक संघाला शुभेच्छा दिल्या आहेत.
टोकियो ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याच्या जिद्दीनं जात असताना, सर्व खेळाडूंनी, प्रशिक्षक, मॅनेजर, संपूर्ण टीमनं कोरोनापासून बचावाची काळजी घ्यावी. जपानमध्ये कोरोनाचं प्रमाण कमी असलं तरी अनेक देशातून तिथं खेळाडू येणार आहेत. त्यामुळे भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूंनी, सपोर्ट टीमच्या सदस्यांनी आपली व सहकाऱ्यांची काळजी घ्यावी. कोरोनाप्रतिबंधक नियमांचं पालन करा. स्वत:ला, सहकाऱ्यांना कोरोनामुक्त ठेवण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यावर, देशावर दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे. खेळाची मैदानं, जिम, क्रीडास्पर्धांचं आयोजन अनेक गोष्टींवर वर्षभरापासून निर्बंध आहेत. काही ठिकाणी निर्बंध शिथिल झाले असले तरी गेले वर्षभर, अनेकांना घराबाहेर पडता आले नाही. मैदानात खेळता आले नाही. जिममध्ये व्यायाम करता आला नाही. सतत घरात आणि एकाच जागेवर दीर्घकाळ बसून राहण्याचे जे दुष्परिणाम असतात, ते अनेकांच्या शरीरावर दिसू लागले आहेत. जागतिक खेळाडू असू देत की, तुमच्या-माझ्यासारखी सामान्य व्यक्ती. प्रत्येकानं व्यायाम केला पाहिजे. घरात-अंगणात-गच्चीवर सोशल डिस्टन्सिंग राखून व्यायाम सुरु ठेवा. चालणे, धावणे यासारखे हालचाल वाढवणारे व्यायाम शरीर, मन तंदुरुस्त ठेवतात. योगा-प्राणायामानं हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते. पैशापेक्षा आरोग्य महत्त्वाचं आहे हे कोरोना संकटानं आपल्याला सांगितलं. जान है तो, जहाँ है.. हे सुद्धा पटवून दिलं. तेव्हा प्रत्येकानं आरोग्याची काळजी घ्यावी, स्वत:ला तंदुरुस्त ठेवावं, असं आवाहनही अजित पवार यांनी केले आहे.
माझं कुटुंब… माझी जबाबदारी. माझी सोसायटी, माझं गाव, माझं शहर, माझा तालुका, जिल्हा, माझं राज्य, माझा देश ही सुद्धा माझी जबाबदारी आहे, हे लक्षात ठेवा. राज्याला, जगाला, कोरोनामुक्त करायचं असेल तर, सुरुवात, मी स्वत:पासून, स्वत:च्या कुटुंबापासून केली पाहिजे. आजच्या जागतिक ऑलिंपिक दिनी आपण स्वत:ला व कुटुंबाला कोरोनामुक्त ठेवण्याचा संकल्प करुया, असे सांगत टोकियो ऑलिंपिकसाठी जाणाऱ्या संघासाठी चीनी प्रायोजक कंपन्यांना टाळावं, अशी देशवासियांची लोकभावना आहे. त्या लोकभावनेचा आदर होईल आणि तो केला जावा, असे आवाहनही त्यांनी केलं आहे.
जागतिक ऑलिंपिक संघटना असो की महाराष्ट्र आलिंपिक संघटना, खेळांच्या माध्यमातून समाजात एकता, समता, बंधुता, खिलाडूपणाची भावना रुजवण्याचा, सुसंस्कृत, समर्थ, सशक्त, निरोगी समाज घडवण्याचा प्रयत्न राज्यातील, देशातील क्रीडा संघटना आणि क्रीडा कार्यकर्ते करत असतात. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागतिक ऑलिंपिक दिनाच्या निमित्तानं त्यांनी राज्यातील क्रीडा कार्यकर्त्यांचेही आभार मानले आहेत.