प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्राची वाटचाल….

मुंबई –

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात प्रजासत्ताक दिन साजरा होतो आहे. समस्त कोकण विभागातील जनतेला महाराष्ट्र शासनाच्यावतीने शुभेच्छा! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धव बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणतात. “आम्ही सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करत आहोत. काम करत राहू आणि सर्वांगीण विकासाच्या बाबतीत महाराष्ट्राला देशात पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवू”. महाराष्ट्र शासनाने सर्वच क्षेत्रात सर्वांगीण प्रगती केली आहे. उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार म्हणतात त्याप्रमाणे “छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले. राजर्षी शाहू महाराज. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांवरच महाराष्ट्राची वाटचाल सुरु आहे”. राज्याचे महसूलमंत्री श्री.बाळासाहेब थोरात म्हणतात, “सर्वसामान्य माणूस, शेतकरी, उद्योजक, विद्यार्थी, व्यापारी आदी घटकांना आधार देत एकजुटीने, एकदिलाने काम करून सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राची पताका डौलाने फडकवत ठेवू”. याचा अर्थ असा की सर्वसामान्य माणसाचा विकास महत्त्वाचा आहे. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी घटनेने दिलेल्या अधिकारांचा वापर करून विकासाचे चक्र कायम ठेवायचे आहे.

भारताला ब्रिटीश राजवटीपासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हा स्वतंत्र भारताला स्वतःचे संविधान नव्हते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली गेली.  या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. या सभेने सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात हा प्रस्ताव 166 दिवसांसाठी खुला केला आणि 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाच्या कालावधी नंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. त्यावर विचार विनिमय आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या 308 सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रती (हिंदी आणि इंग्रजी) 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारताचे संविधान संपूर्ण राष्ट्रासाठी लागू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताचा प्रजासत्ताक दिन हा 26 जानेवारी 1950 पासून साजरा करण्यात येऊ लागला. आज 72 वर्षे होत आहेत आणि या काळात देशाने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे.

महाराष्ट्रात गेली 75 वर्षे शेती, विद्यार्थी, युवक, महिला व बालविकास, उद्योग, कामगार, कायदा व सुव्यवस्था, गृहनिर्माण, ऊर्जा, जलसंपदा, पर्यावरण, बंदरे, मत्स्य विकास आदी क्षेत्रात लक्षणीय बदल झाले आहेत. मराठी भाषा व संस्कृतीसाठी राज्याने केलेले काम देशात अग्रेसर आहे. अलीकडेच दुकानांच्या पाट्या मराठी करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला. या वर्षात दर्शनिका विभागाकडून महात्मा गांधी यांचे संकलित वाड्:मय 1 ते 98 खंडापैकी 1 ते 50 खंड ई-बुक स्वरुपात प्रकाशित करण्यात आली आहेत. राज्य शासनाच्या प्रत्येक कार्यालयात जनसंवाद आणि जनहित या संबंधितच्या धोरणामध्ये मराठीचा वापर त्याशिवाय मराठी भाषा अधिकारी कार्यालयात नेमण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळामध्ये विविध कार्यक्रमही राबविण्यात येत आहेत. भाषा संचालनालयाद्वारे शासन शब्द कोश भाग-1 हे ॲप स्वरुपात मोबाईलवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. यामध्ये कार्यदर्शिका, शासन वाक्य प्रयोग, शासन व्यवहार कोश आणि न्याय व्यवहार कोश असे एकूण 4 कोश डिजीटल स्वरुपात उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

कोविडच्या काळात राज्याची आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने मोठया प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती केंद्र उभे केले. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेशी संलग्न करून या योजनेत 1 हजार रुग्णालये सहभागी झाली आहेत. यामध्ये 288 शासकीय आणि 712 खाजगी रुग्णालयांचा समावेश आहे. रुग्णांना 34  विशेष तज्ञ सेवांसाठी जवळपास 1 हजार 209 पॅकेजचा लाभ मिळतो.  शासनाने स्व.बाळासाहेब ठाकरे अपघात योजना सुरु करून राज्यातील रस्ते अपघातातील जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचार, जखमी व्यक्ती कोणत्याही राज्य किंवा देशाची असली तरी योग्य ते वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देण्यात येतात. कोविड काळात राज्याने राबविलेल्या माझे कुटूंब माझी जबाबदारी, माझे गांव कोरोनामुक्त गांव, माझी सोसायटी कोरोनामुक्त सोसायटी, माझा विद्यार्थी माझी जबाबदारी असे विविध अभियान सुरु करून कोविड संसर्ग रोखण्याचा प्रयत्न झाला आणि त्यात यश आले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदूमील येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य स्मारक, स्व.बाळासाहेब ठाकरे यांचे राष्ट्रीय स्मारक, राज्यातील मेट्रो प्रकल्पांसाठी भरीव तरतूद, मेट्रोसाठी बहुपक्षीय कर्ज सहाय्य उपलब्ध करून दिलेले आहे. स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्राची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. देशातील एकूण पुरस्कारांच्या 40 टक्के पुरस्कार हे महाराष्ट्र राज्याला मिळाले आहेत. नवी मुंबई हे शहर महाराष्ट्राचे पहिले वॉटर प्लस सर्टिफिकेटचे मानकरी शहर ठरले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाले आहे. मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ सुरु आहे. वर्सोवा-ब्रांदा सागरी सेतू आणि वर्सोवा ते विरार सागरी सेतू अहवाल तयार करण्यात येत आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना जोडणारा सागरी महामार्ग चौपदरी केला जाणार आहे. भिवंडी-कल्याण-शिळफाटा या 21 कि.मी. लांबीचा 6 पदरी रस्ता 389 कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत आहे.  मुंबई ते सिंधुदूर्ग ग्रीन फिल्ट कोकण द्रुतगती महामार्ग लवकरच पूर्ण होईल.

कोकणातील बंदरे विकास हा शासनाचा महत्त्वाचा विषय आहे. मुंबई ते अलिबाग अंतर रोपॅक्स फेरीसेवेने  एका तासात सहज गाठता येईल. रायगड जिल्ह्यातील काशिद जेट्टी येथे प्रवासी जेट्टी, अर्नाळा किल्ला जेट्टी आणि रेवस बंदरापर्यंत जाणाऱ्या पोच रस्त्याचे मजबुतीकरण वेगाने सुरु आहे.

मुंबई शहरात जेथे शक्य आहे तेथे जलवाहतूक सुरु करून सर्वसामान्य माणसाला नवीन वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जात आाहे. कोकणातील मत्स्यव्यवसाय अधिक विकसित व्हावा यासाठी पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आनंदवाडी ता.देवगड जि.सिंधुदूर्ग आणि करंजा ता.उरण जि.रायगड येथे विशेष असे मत्स्य बंदर उभारले जात आहेत. हरणे, साखरीनाटे, जीवना, भरडखोल, सातपाटी या 5 प्रमुख मत्स्य बंदरांच्या विकासासाठी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डामार्फत काम सुरु आहे.

कृषि पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण, कॅरेव्हॅन पर्यटन धोरण, साहसी पर्यटन उपक्रम, आदरातिथ्य क्षेत्राला औद्योगिक दर्जा, मुंबई पर्यटन आणि ब वर्ग पर्यटनस्थळांचा विकास या माध्यमातून पर्यटन वृध्दीसाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत 500 चौ.फुटांच्या घरांना कर माफी देऊन शासनाने सर्व सामान्य जनतेची मागणी पूर्ण केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात महाराष्ट्राची प्रगती सर्वच क्षेत्रामध्ये सुरु आहे. राज्यावर आलेली नैसर्गिक संकटे, कोविड सारखी भयंकर साथ या सर्व पार्श्वभूमीवर आर्थिक संकटांवर मात करून राज्य प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. हे विशेष.

भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने असे म्हणता येईल की, महाराष्ट्र सर्वच क्षेत्रात पुढे जात असतांना मोठया परिवर्तनाच्या टप्प्यावर उभा आहे. राज्यातील उपलब्ध साधनसामुग्री आणि सर्व व्यक्तींच्या क्षमता यांचा योग्य वापर करून राज्य पुढे जात आहे. भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर देशात अनेक बाबतीत प्रगती झाली. राज्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सर्वसामान्य माणूस हाच विकासाचा केंद्रबिंदू मानून राज्य शासन योजना आखित आहे. संत गाडगेबाबांची दशसूत्री अन्न, पाणी, वस्त्र, शिक्षणासाठी मदत, निवारा, औषधोपचार, रोजगार, अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न आणि दु:खी व निराशांना हिंमत यावर आधारित राज्याची वाटचाल सुरु आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्ताने आपली लोकशाही अधिक बळकट करून या देशाचे संविधान हेच महत्त्वाचे आहे. हे ध्यानी ठेवून विकासाची वाटचाल सुरु आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!