मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी! लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार

मुंबई

मुंबई लोकलनं प्रवास करणार्‍यांसाठी सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे. आता लसीकरण पूर्ण होऊन 15 दिवस झालेल्यांना लोकलचं तिकीट मिळणार आहे. राज्य सरकारने लोकलची तिकीटस विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला होता. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले आहे. या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अश्या सर्वच प्रवाश्यांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे.

त्यासाठी रेल्वेने अतिरिक्त कर्मचारी स्थानकावर ठेवावे, फक्त लसीकरण झालेले प्रवासीच तिकीट आणि पास घेत आहेत याची खात्री करावी, कोविड नियम पाळले जात आहेत याची खात्री करावी अशा सूचना देखील राज्य सरकारने केल्याचे पत्रात आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांच्या पाठोपाठ दोन लस घेतलेल्या नागरिकांना 15 ऑॅगस्टपासून लोकल प्रवासास परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन डोस घेतले आहेत आणि त्याला 14 दिवस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवासासाठी पास मिळायचा.

18 वर्षाच्या आतील मुलांना आणि काही मेडिकल कन्डिशनमुळे लस घेऊ शकले नसणार्‍या नागरिकांना 15 ऑॅक्टोबरपासून रेल्वे प्रवासासाठी पास दिला जाऊ लागला आहे. 18 वर्षाखालील मुलांना प्रवासाच्या वेळी ओळखपत्र सोबत बाळगावे लागणार. यासंदर्भात राज्य सरकारने केलेल्या सूचनेनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेने या मुलांना लोकल प्रवासासाठी पास देण्याचा निर्णय घेतला होता. यामुळं 18 वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही महत्वाच्या मेडिकल कन्डिशनमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी पास मिळणार आहे. अशा लोकांनी पास काढतेवेळी तसं डॉक्टरांचं प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे.

देशभरातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल

देशभरातील रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकामध्ये बदल होणार आहे. 1 नोव्हेंबरपासून नवे वेळापत्रक लागू करण्यात येणार आहे. 13 हजार प्रवासी गाड्या आणि 7 हजार मालगाड्यांच्या वेळेत हे बदल होणार आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!