कंपनीला रेडीशेड, जमीन उपलब्ध करून देणार : उद्योगमंत्री सुभाष देसाई

अमेरिकेच्या ‘जेबिल’ कंपनीची राज्यात दोन हजार कोटींची गुंतवणूक

मुंबई, दि. १८ : अमेरिकेची जेबिल कंपनी महाराष्ट्रात गुंतवणूक व विस्तार करणार असून सुमारे दोन हजार कोटी गुंतवणूक करण्याची तयारी कंपनीने दर्शविली आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये कंपनी आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. प्रस्तावित प्रकल्पासाठी उद्योग विभागाच्यावतीने सर्व सहकार्य केले जाईल. कंपनीला रेडीशेड, जमीन व इतर सुविधा प्राधान्याने दिल्या जातील, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.

याच अनुषंगाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासोबत कंपनीच्या प्रतिनिधींसोबत वेबिनारद्वारे चर्चा केली. यावेळी जेबिल कंपनीचे भारतातील प्रमुख डॅन वँग, डेसमाँड चेंग, सुधीर बालकृष्णन, व्हिक्टर मोनोरॉय, सुधीर साहू, पॅक्ट्रीक कॉनली यांच्यासह उद्योग विभागाचे सचिव बलदेव सिंग, एमआयडीसी सीईओ डॉ. पी. अन्बलगन आदी यावेळी उपस्थित होते.

इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मितीत जेबिल कंपनी आघाडीवर आहे. महाराष्ट्रात स्मार्ट फोन, मोबाईलचे सुटे भाग, स्मार्ट गृहोपयोगी वस्तू, अन्न व खाद्यपदार्थाचे वेष्ठन निर्मित आदी क्षेत्रात आपल्या प्रकल्पाचा विस्तार करणार आहे. याद्वारे सुमारे दोन हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. यातून सुमारे १३ हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होणार आहे. पुणे जिल्ह्यातील रांजणगाव किंवा तळेगावमध्ये प्रकल्प सुरू करण्याच मानस कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केला.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!