समीर वानखेडेंवर नवाब मलिकांचे पुन्हा आरोप, मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी

मुंबई,

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात श्रीमंतांना अडकवून वसुली केली जात असल्याचा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मुंबईत अंमली पदार्थ प्रकरणात जी कारवाई होत आहे, ती केवळ वसुलीच्या उद्देशाने केली जात असून या प्रकरणी आपण मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
गोसावीच्या बॉडीगार्डनेच आर्यन खान अंमली पदार्थप्रकरणी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे हे षडयंत्र समोर आलं आल्याचा दावा मलिक यांनी केला आहे. ज्यांच्याकडून पैसे वसूल करण्यात आले आहेत, तेदेखील याविषयी बोलतीलच, असंही त्यांनी म्हटलं आहे.
बोगस केसेस तयार करून सेलेबि-टी आणि श्रीमंतांना त्यात अडकवायचं आणि त्यांच्याकडून तोडपाणी करून पैसे लाटायचे, असा उद्योग एनसीबीतील अधिकारी करत असल्याचा आरोप त्यांनी केला. बॉलिवूडमध्ये अंमली पदार्थप्रकरणी गेल्या वर्षी एक गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉलिवूडधील अनेक कलाकारांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. मात्र अद्याप एकालाही साधी अटकदेखील करण्यात आलेली नसल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर टीकास्त्र सोडलं.
एनसीबी अधिकार्‍यांकडून होणारी वसुली ही चिंतेची बाब असून गोसावी कोण आहे, संघटित गुन्हेगारी सुरु झाली आहे का, या प्रश्नांचा शोध घेण्यासाठी एसआयटी स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. परमबीर सिंह सारखे लोक पुन्हा सक्रीय झाले असून त्यामुळे तोडपाण्याचे प्रकार वाढले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सध्या आपण बीडला असून त्यानंतर परभणी आणि बीडला जाणार असून मुंबईत परत आल्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!