दोषींवर कारवाई करणार, इक्बाल सिंह चहल यांनी दिले चौकशीचे आदेश

मुंबई,

मुंबईतल्या करी रोड येथील अविघ्न पार्क इमारतीत एका अपार्टमेंटमध्ये शुक्रवारी आग लागली. रहिवासी इमारतीच्या 19व्या मजल्यावर ही आग लागली. या घटनेत एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ही आग आता आटोक्यात आल्याची माहिती समोर येतेय. आगीची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घटनास्थळी धाव घेतली. यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

परिस्थितीची पाहणी केल्यानंतर चहल यांनी ही आग नियंत्रणात आली असल्याची माहिती दिली. दरम्यान बीएमसीने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

घटनास्थळी पोहोचलेले मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. आग आटोक्यात आली असून सध्या कूलिंगचे काम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिस्थितीची पाहणी केली. यावर प्रतिक्रिया देताना महापौर म्हणाल्या की, ही आग कशामुळे लागली याबद्दल अद्याप काही माहिती समजू शकलेली नाही. राम तिवारी नावाची व्यक्ती लटकत होती. 10 मिनिटांपेक्षा जास्त ही व्यक्ती लटकत होती. त्या व्यक्तीचा यात मृत्यू झाला.

राम तिवारी ज्यावेळी इमारतीला लटकत होते. त्यादरम्यान थोडी समयसूचकता दाखवली असती, पडू नये याची काळजी घेतली असती तर त्याचा आज जीव वाचला असता. मृत राम तिवारी या इमारतीतलाच कामगार होता, असं महापौर म्हणाल्या आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीवरुन खाली पडलेला हा इसम इमारतीचा सुरक्षारक्षक असल्याचं बोललं जात आहे. हा इसम आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीत आला. मात्र आगाच्या ज्वाळा इतक्या होत्या की त्या इसमाने आपला बचाव करण्यासाठी गॅलरीला लटकला. यानंतर या इसमाने इमारतीवरुन उडी घेतली.

ही आग इतकी भीषण आहे की आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात दिसत आहेत. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. 19व्या मजल्यावर लागलेली ही आग आता इमारतीच्या इतर मजल्यांवर सुद्धा पसरली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 20 गाड्या दाखल झाल्या आहेत. वन अविघ्न पार्क ही 60 मजली इमारत असून तिच्या 19व्या मजल्यावर दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास आग लागली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!