वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी प्रत्येकाने वेळ काढून वाचन करावे – प्रधान सचिव राजेंद्र भागवत
मुंबई, दि. २२ :
वाचनसंस्कृती वाढावी आणि ती जोपासली जावी यासाठी प्रत्येकाने वेळात वेळ काढून वाचन करावे आणि नव्या पिढीलाही वाचनाची आवड लावावी, असे आवाहन विधीमंडळाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी केले. विधीमंडळ सचिवालयाच्या मराठी भाषा समिती कक्षामार्फत सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल महाजन, वि. स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक तथा जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने, ग्रंथपाल तथा माहिती संशोधन अधिकारी निलेश वडनेरकर उपस्थित होते. यावेळी श्रीमती आरती बापट, सचिन बोरकर, विनय पाटील, श्रीमती अन्नपूर्णा इंगळे या सचिवालयातील कर्मचाऱ्यांनी वाचलेल्या उत्कृष्ट मराठी साहित्याबद्दल मनोगत व्यक्त केले.
प्रधान सचिव श्री. भागवत यांनी ग्रंथांचे महत्त्व सांगताना गुरुचा दर्जा देण्यात आलेल्या गुरुग्रंथ साहेब याचा उल्लेख केला. त्याचबरोबर पंडीत नेहरु, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या थोर नेत्यांनी लिहिलेल्या साहित्याचा दाखला ही दिला. वाचन प्रेरणादिन साजरा करत असताना मोबाईलमुळे वाचन कमी झाल्याची तक्रार करण्यापेक्षा मोबाईलच्या माध्यमातून वाचन करण्याचा पर्याय त्यांनी सुचविला. विधीमंडळाच्या ग्रंथालयातील पुस्तके आता पीडीएफ स्वरुपात वाचता येणार असल्याने त्याचा लाभ घ्यावा असे त्यांनी आवर्जुन सांगितले.
ग्रंथांच्या सहवासात ज्ञान आणि अपार आनंद मिळतो या माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी. जे अब्दुल कलाम यांच्या वचनानुसार ज्ञानासह आनंद मिळविण्यासाठी आपण वाचन करत असल्याचे श्री. मदाने यांनी सांगितले. ते म्हणाले, वाचनाची आवड असली की सवड मिळतेच. कला, साहित्य, इतिहास, विज्ञान, तत्वज्ञान आणि अशी ढोबळमानाने साहित्याची विभागणी करता येते. यातील आपल्या आवडीच्या विषयाचे वाचन करण्यासाठी सतत पुस्तक सोबत ठेवावे. जीवनाला आकार देण्यासाठी थोरा मोठ्यांच्या सहवासात राहणे आवश्यक आहे. ती संधी पुस्तकाच्या रुपाने मिळते, असे श्री. मदाने म्हणाले.
श्री. वडनेरकर यांनी ग्रंथालयाचे महत्त्व विषद केले. विधानमंडळ ग्रंथालयात अनेक दुर्मीळ ग्रंथ आहेत. या ग्रंथालयात पिठासीन अधिकारी, आमदार, पत्रकार आणि विद्यार्थी येत असतात. ग्रंथसंपदा अमाप आहे, मात्र वाचकांचा प्रतिसाद अजून वाढण्याची आवश्यकता आहे. सजग आयुष्य जगण्यासाठी ग्रंथालयाला भेट द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
काय वाचता? का वाचता? काय आवडले?
विधीमंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येत असतात. मराठी भाषेच्या संवर्धनासाठीही विविध उपक्रम राबविण्यात येतात. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वाचन आणि बोलते करण्यासाठी स्वत: वाचलेल्या उत्कृष्ट मराठी साहित्याबद्दल माहिती सादर करण्यास सांगण्यात आले होते. यात आपण काय वाचता? का वाचता आणि वाचलेल्या पुस्तकातील काय आवडले याविषयी सादरीकरण करण्यासाठी आवाहन करण्यात आले होते. आज अशाच चार पुस्तकांच्या माहितीचे सादरीकरण येथे करण्यात आले. यात अशोक समेळ लिखित ‘मी अश्वत्थामा, मी चिरंजीव’, जयंत नारळीकर यांचे ‘चार महानगरातील माझ विश्व’, बेट्टी मेहमदी यांचे अनुवादीत पुस्तक ‘नॉट विदाऊट माय डॉटर’ आणि व्यंकटेश माडगुळकरांचे ‘नागझीराची सफर’ या पुस्तकांचा समावेश होता.