नवाब मलिकांचे समीर वानखेडेंच्या बहिणीवर आरोप; मनसे आक्रमक
मुंबई,
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची बहीण जास्मिन वानखेडे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांनी आरोप केले होते. मनसेने यासंदर्भात पत्रकार परिषद घेत जास्मिन यांची पाठराखण केली आहे. तसेच नवाब मलिक यांच्याकडून जास्मिन वानखेडे यांच्यावर केले जाणारे आरोप आम्ही खपवून घेणार नसल्याचे मनसे नेते अमेय खोपकर यांनी म्हटले आहे. मनसे चित्रपट सेनेच्या जास्मिन वानखेडे या पदाधिकारी राहिल्या आहेत. त्या रात्रंदिवस महिला आणि मुलांसाठी काम करतात आणि त्यांना न्याय मिळवून देतात. आमच्या पदाधिकार्यावर खालच्या पातळीची टीका केल्यास आम्ही खपवून घेणार नाही. त्यांच्या विरोधात नवाब मलिकांकडे काय पूरावे आहेत, हे त्यांनी दाखवून द्यावे, असे आव्हान देखील मनसेने नवाब मलिक यांना दिले आहे.
नवाब मलिक हे कुठले डॉन आहेत का? सर्वजण नवाब भाई बोलतात. एखाद्या महिलेला लेडी डॉन त्यांनी बोलणे चुकीचे आहे. मलिकांनी जास्मिन वानखेडेवर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. मनसे चांगल्या कामाच्या मागे नेहमीच उभी राहील, असेही खोपकर म्हणाले. महाराष्ट्रात जिथे चित्रपटांची शूटिंग चालते, तिथे राष्ट्रवादी काँग-ेसचे कार्यकर्ते जाऊन वसुली करतात, त्यांची लिस्ट देतो, त्यांना अटक करून दाखवा, असे आव्हान खोपकर यांनी नवाब मलिक यांना केले. दरम्यान, समीर वानखेडे जे काम करत आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. त्यांच्या कामामुळे तरुण पिढी वाचू शकते, असे शालिनी ठाकरे यांनी म्हटले आहे.