नेट-सेट संघर्ष समितीकडून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांचा सत्कार

मुंबई, दि. 21 :

राज्यातील अकृषी विद्यापीठे आणि अशासकीय अनुदानित महाविद्यालयांमधील बिगर नेट तसेच सेट अध्यापकांना निवृत्तीवेतनाचा लाभ मिळत नव्हता. जवळपास 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागल्याच्या पार्श्वभूमीवर  नेट-सेट संघर्ष समितीच्या वतीने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचा मुंबईत सत्कार करण्यात आला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत म्हणाले की, यामध्ये जे अध्यापक 23 ऑक्टोबर 1992 ते 3 एप्रिल 2000 या कालावधीत नियुक्त होते अशांना हे निवृत्तीवेतन देण्यात येईल. शासन निर्णय 18 ऑक्टोबर 2001 व 27 जून 2013 नुसार उपरोक्त कालावधीतील बिगर नेट-सेट अध्यापकांच्या सेवा सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंत सुरु ठेवण्यात आल्या असल्याने त्यांच्या मूळ नियुक्तीचा दिनांक गृहीत धरुन सेवानिवृत्ती वेतन देण्यात येणार आहे.

प्रा.डॉ.गोविंद काळे म्हणाले, नेट-सेट संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यच्यावतिने १९९८ पासून सतत संघर्ष सुरू होता. विद्यापीठ, युजीसी, महाराष्ट्र शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू होता. जवळपास 25 वर्षांपासून हा संघर्ष सुरू होता. गेल्या वर्षभरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री.सामंत यांनी सतत पाठपुरावा करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठका घेऊन आम्हाला न्याय दिला आहे. नेट-सेट संघर्ष समितीचे राज्यातील विविध भागातील पदाधिकारी यांच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा महाराष्ट्राची कुलस्वामिनी  तुळजाभवानीचा फोटो, सन्मान पत्र देवून व कवड्याची माळ घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना प्रांताध्यक्ष व अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष ज.मो. अभ्यंकर, प्रा.बिपिन शिंदे, प्रा.राजू कदम (औरंगाबाद) प्रा.चौधरी (सोलापूर)प्रा.अनिल पाटील (पणे) प्रा.डॉ.अविनाश शेंद्रे (मुंबई) प्रा.यु. जी. पाटील, प्रा.बी.एम. पाटील(जळगाव) आदि विद्यापीठाचे नेट/सेट संघर्ष समितीचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!