वातानुकुलित मिनी बस सेवेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या वेळ आणि पैशांची बचत – पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे

वातानुकुलित मिनी बेस्ट बससेवेचा शुभारंभ

मुंबई, दि. 21 :

मुंबईतील ऐतिहासिक घडामोडी अनुभवलेल्या काळाचौकी परिसरासतील गं. द. आंबेकर मार्गावरुन दादर रेल्वे स्थानकापर्यंत थेट वातानुकूलित मिनी बेस्ट बससेवेच्या सुविधेमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वेळ आणि  पैशाची नक्कीच बचत होणार, असा विश्वास  पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

गं. द. आंबेकर मार्गावरील श्रावण यशवंते चौक ते दादर रेल्वे स्थानक या दरम्यान वातानुकूलित मिनी बेस्ट बस सेवेचा शुभारंभ पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी त्या बोलत होत्या.

चाकरमानी, कामगार, महिलावर्गास काळाचौकी ते दादर हा प्रवास सार्वजनिक वाहनाने टप्प्याटप्प्याने करावा लागत होता. गं. द. आंबेकर मार्गावरील या थेट बेस्ट बससेवेमुळे नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे. या बससेवेसाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अभिनंदनही  राज्यमंत्री कु. तटकरे यांनी केले.

काळाचौकी येथून गं. द. आंबेकर मार्गे  भोईवाडा, नायगाव दादर परिसरांत जाण्याकरिता अद्यापपर्यंत बस सेवा उपलब्ध नव्हती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार श्रावण यशवंते चौक ते दादर स्टेशन अशी ए-64  ही मिनी वातानुकुलीत बेस्ट बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या बस सेवेमुळे नागरिकांना गं. द.आंबेकर मार्गावर बेस्ट बसने प्रवास करणे आता शक्य होणार आहे.

यावेळी बेस्ट समिती सदस्य बबन कनावजे, विजय वाडकर, राष्ट्रीय मिल मजदुर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, उमेश येवले व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ए-64 या मिनी बसच्या पहिल्याच तिकीटाने प्रवास केल्याचा आनंद

‘श्रावण यशवंते चौक ते दादर स्टेशन’पर्यंत धावलेल्या पहिल्या वातानुकुलित मिनी बसच्या पहिल्याच तिकीटाने प्रवास करण्याचा मान पर्यटन राज्यमंत्री कु. आदिती तटकरे यांना मिळाला. या मिनीबसच्या शुभारंभप्रसंगी सर्व प्रवाश्यांसोबत राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या कार्यालयापर्यंत प्रवास केल्याचा आनंद त्यांनी यावेळी व्यक्त केला. येथील प्रवाशांच्या आनंदात सहभागी होता आले यासाठी बेस्टचे व कार्यक्रम आयोजकांचे आभारही कु. तटकरे यांनी मानले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!