पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्याची गरज; प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी कामांना गती द्यावी – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
मुंबई, दि. 21 :
जल जीवन मिशन अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्यभरात विविध ठिकाणी सुरु असलेली पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेवर पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यामुळे याकामी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांकडून कामे गतिमान होतील, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रकल्प व्यवस्थापन संस्थांच्या (पीएमसी) कामकाजासंदर्भात मंत्रालयात पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ह्रषिकेश यशोद, मुख्य अभियंता सर्वश्री राजेश निघोट, श्री. रहाणे, श्री. लोलापवार, संचालक (वित्त) श्री. मडके, अधीक्षक अभियंता पी. आर. नंदननवरे व प्रशांत भामरे यांच्यासह प्रकल्प व्यवस्थापन संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. प्रत्येक घरात वैयक्तिक नळजोडणीद्वारे कमीत कमी 55 लीटर प्रति माणसी प्रति दिन गुणवत्तापूर्ण पाणीपुरवठा करणे हे या मिशनचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे या योजनेतून जी कामे राज्याच्या विविध विभागात सुरु आहेत, ती वेळेवर पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रकल्प व्यवस्थापन संस्थांनी संबंधित गावांचा सर्व्हे करुन प्रकल्प अहवाल वेळेत देणे आवश्यक आहे. या कामामध्ये कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये, असे पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी स्पष्ट केले.
राज्यात पुणे, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, कोकण, नागपूर, या सहा विभागातील एकूण 456 योजनांपैकी 198 योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. वेळेत कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने या संस्थांनी कार्यवाही करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यांनीही ही कामे संस्था वेळेवर पूर्ण करतील, यासाठी नियमितपणे पाठपुरावा करणे आणि आढावा घेणे आवश्यक असल्याचे मंत्री श्री. पाटील यांनी नमूद केले.
औरंगाबाद विभागात 18, पुणे विभागात 50, नाशिक विभागात 80, अमरावती विभागात 34, कोकण विभागात 16 अशा 198 योजनांसाठी प्रकल्प व्यवस्थापन संस्थांची नेमणूक करण्यात आली आहे. या संस्थांनी प्रकल्प अहवाल तयार करुन तातडीने तो विभागाकडे सादर करण्याच्या सूचना पाणीपुरवठा मंत्री श्री. पाटील यांनी दिल्या.