जमीन घोटाळा : ईडी कार्यालय बंद, मंदाकिनी खडसे माघारी
मुंबई,
पुणे येथील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याबरोबर पत्नी मंदाकिनी खडसे यांचीही चौकशी करण्यात येत आहे. भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे या आरोपी आहेत. ईडीने त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते. त्यामुळे त्या चौकशीसाठी ईडी कार्यालयात आल्या होत्या. मात्र, ईडीचे कार्यालय बंद असल्याने त्या आल्या पावली माघारी परतल्या. दरम्यान, आज भेट नाही झाली तर शुक्रवारी परत येणार आहोत, असे त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी माहिती दिली.
मंदाकिनी खडसे ईडी कार्यालयात आपल्या वकिलासोबत आल्या होत्या. ईडी कार्यालय बंद असल्याने कोणालाच न भेटता निघून गेल्या. न्यायालयाच्या आदेशाने 10 ते 5 या वेळेत कार्यालयात बोलावले होते. त्यानुसार त्या ईडी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र, 10 नंतरही ईडीचे कार्यालय बंद होते. त्यामुळे त्या माघारी परतल्या.
दरम्यान, अनेकवेळा तपास यंत्रणा कार्यालयांना सुट्टी नसते, तपास यंत्रणा या सुरु असतात आज सुट्टीबाबत काही सूचना नव्हती. न्यायालयाच्या आदेशाने मंगळवारी आणि शुक्रवारी जाण्यास सांगितले त्यानुसार आलो. आज भेट झाली नाही तरी शुक्रवारी परत येणार आहोत, अशी माहिती वकील मोहन टेकावडे यांनी दिली.
पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आरोपी आहेत. त्यांच्या विरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मंदाकिनी खडसे यांनी अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र सत्र न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळून लावला होता.