मुंबईकरांसाठी सर्वात आनंदाची बातमी; कोरोना महामारी सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच एकही मृत्यू नाही
मुंबई,
भयानक कोरोना महामारी सुरू झाल्यापासून देशातील सर्वात महत्त्वाचे शहर असलेल्या मुंबईत दररोज कोरोना रुग्ण वाढतच होते. आता मात्र, सर्वत्र कोरोना स्थिती नियंत्रणात येत असून मुंबईतील कोरोना रुग्ण सापडण्याचं प्रमाणही खूप कमी झालं आहे. विशेष म्हणजे आज मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ही मुंबईकरांसाठी खूप दिलासादायक बाब आहे. बृहन्मुंबई महापालिकेने जाहीर केलेल्या पत्रकामध्ये आज एकाही कोरोना मृत्यूची नोंद नाही.
कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाणही कमी होत आहे. आज शहरात एकूण 367 पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून आज 518 जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले. आज मुंबईत नव्यानं 28697 जणांच्या कोविड चाचण्या करण्यात आल्या. सध्या रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मुंबईत 97 टक्के इतके आहे.
दरम्यान, देशात लसीकरणाच्या माध्यमातून कोरोनाविरुद्ध लढाई सुरू आहे. यात लसीकरण हे कोविड महामारीविरोधात मोठं शस्त्र ठरलं आहे. या मोहिमेत देश लवकरच एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचणार आहे. पुढील पाच ते सहा दिवसांत देशात कोरोना लस घेणार्यांची संख्या 100 कोटींचा आकडा पार करेल. आरोग्य विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, शनिवारी संध्याकाळपर्यंत देशात 97.62 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. शनिवारी 38 लाख डोस देण्यात आले. यामुळं भारत एक नव्या इतिहासाच्या जवळ पोहोचला आहे.
केंद्रीय मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू झाल्यापासून एकूण 39,25,87,450 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर, 11,01,73,456 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयानं सांगितलं की, आतापर्यंत देशातील एकूण 69,45,87,576 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आलाय आणि 28,17,04,770 लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. मंत्रालयानं म्हटलंय की शनिवारी देशातील कोविड -19 लसीकरणानं 97.62 कोटींचा आकडा पार केला.