रविवारी उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांची होणार गैरसोय !

मुंबई,

उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वे, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी 17 ऑॅक्टोबर रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे अप आणि डाऊन हार्बर मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या वसई रोड ते वैतरणा अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी-रविवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक –

मध्य रेल्वेचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.55 ते दुपारी 3.55 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.48 ते दुपारी 3.36 पर्यंत सुटणारी डाऊन धीम्या मार्गावरील सेवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळविली जाऊन भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव व कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे डाउन धिम्या मार्गावर वळविली जाईल. घाटकोपर येथून सकाळी 10.40 ते दुपारी 3.52 पर्यंत सुटणारी अप धीम्या मार्गावरील सेवा विद्याविहार आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अप जलद मार्गावर वळविली जाऊन कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक –

हार्बर मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी वांद्रे डाउन आणि अप हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते सायंकाळी 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. या ब्लॉक दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवडाळा रोड येथून सकाळी 11.34 ते सायंकाळी 4.47 पर्यंत वाशी बेलापूर पनवेल करीता सुटणार्‍या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.56 ते सायंकाळी 4.43 या वेळेत वांद्रे गोरेगावकडे जाणार्‍या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेलबेलापूरवाशी येथून सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणार्‍या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाववांद्रे येथून सकाळी 10.45 ते सायंकाळी 4.58 पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणार्‍या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. तथापि, ब्लॉक कालावधी दरम्यान पनवेल आणि कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

पश्चिम रेल्वे मार्गवर रात्रकालीन ब्लॉक –

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी शनिवारी- रविवारी रात्री चार तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई रोड ते वैतरणा स्थानकादरम्यान अप- डाऊन जलद मार्गावर शनिवारी-रविवारच्या रात्री 11. 50 ते पहाटे 4. 30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमीत ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अप आणि डाऊन दिशेच्या सर्व मेलएक्स्प्रेस गाड्या 15 मिनिटांनी उशिराने धावणार आहेत. ट्रेन क्र 09101 विरार-भरूच मेमू ही गाडी ब्लॉक दरम्यान आपल्या निर्धारित वेळेवर 04.50 वाजता विरारहून सुटेल.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!