राजभवन येथील पोलीस कॅन्टीन स्टोअरचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई प्रतिनिधी

दि. 17 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज सकाळी राजभवन निवासी संकुल येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे स्टोअर उद्घाटन संपन्न झाले. बृहन्मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यावेळी उपस्थित होते.

राज्यपालांनी आयुक्त नगराळे यांचेसोबत कॅन्टीन स्टोअरला भेट देऊन विविध उत्पादनांची तसेच गृहोपयोगी वस्तूंची माहिती घेतली. हे कॅन्टीन स्टोअर्स पूर्णपणे रोखविरहित असेल. ग्राहकांना केवळ कार्डद्वारे खरेदी केलेल्या वस्तूंचे बिल भरता येईल.

राजभवन येथील पोलीस कॅन्टीनमधून महाराष्ट्र पोलीस तसेच राज्य राखीव पोलीस दलाचे राजभवन व जवळपासच्या परिसरात कर्तव्य बजावित असलेले जवान तसेच राजभवनातील कर्मचारी व अधिकारी यांना अन्नधान्य, किराणा सामान, इलेक्ट्रोनिक वस्तू तसेच दैनंदिन उपयोगाच्या वस्तू माफक दरात उपलब्ध होणार आहेत.

राजभवन परिसरात सुरु करण्यात आलेले पोलीस कॅन्टीन मुंबईतील सहावे पोलीस कॅन्टीन आहे.

मुंबई पोलीस सबसिडीअरी कॅन्टीनचे उद्घाटन तत्कालीन राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या हस्ते दिनांक 26 जानेवारी 2012 रोजी करण्यात आले होते. सध्या नायगाव, वरळी, मरोळ, ताडदेव व कोळे कल्याण या ठिकाणी कॅन्टीनच्या शाखा आहेत.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!