सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार
अर्ज केलेल्या मंडळातील जिल्ह्यातच परीक्षा केंद्र – आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील
मुंबई, दि. 17 :
राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट ‘क’ संवर्गातील पदभरतीसाठी उमेदवारांना परिक्षेसाठी केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला आहे. उमेदवारांने अर्ज केलेले पद ज्या नियुक्ती अधिका-यांचे अंतर्गत येते त्याच विभागातील जिल्ह्यात उमेदवारांस परीक्षा केंद्र दिले गेले आहे, असे स्पष्टीकरण आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी आज केले आहे.
याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे स्पष्टीकरण दिले आहे. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, गट क संवर्गातील पदभरतीसाठी २४ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या भरतीसाठी एक संवर्ग राज्य, मुंबई स्तरावरील आहे. २३ संवर्ग राज्य, पुणे स्तरावरील आहेत. तर आठ मंडळ स्तरावर २८ संवर्ग आहेत. राज्य स्तरावरील नियुक्ती अधिकारी संबंधित सहसंचालक तर मंडळ स्तरावर संबंधित उपसंचालक नियुक्ती अधिकारी आहेत. न्यासा कम्युनिकेशन कंपनी मार्फत ही परीक्षा घेतली जाणार आहे.
गट क मधील ५२ संवर्गातील २७३९ पदांसाठी ४०५१६३ अर्ज आले आहेत. परीक्षेसाठी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही कालपासून सुरू झाली आहे. आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत २०७१३७ प्रवेशपत्र डाऊनलोड केले आहेत.
पुर्वीच्या परीक्षांवरुन अंदाज व्यक्त
यापुर्वी आरोग्य विभागाच्यावतीने परिक्षा घेण्यात आल्या होत्या. त्यातील अनुभवावरून काही बाबी निदर्शनास आल्या आहेत. त्या पुढीलप्रमाणे
१) उमेदवार एका पदांसाठी अनेक विभागांत अर्ज करतात.
२) उमेदवार अनेक ठिकाणी किंवा एका ठिकाणी अनेक पदांसाठी अर्ज करतात.
३) उमेदवार अर्ज करताना पदांसाठी शैक्षणिक पात्रतेचा विचार करीत नाहीत.
४) अनेक ठिकाणी अर्ज करणारे उमेदवार नक्की कोणत्या ठिकाणी परिक्षा द्यायची आहे हे निश्चित करीत नाहीत. त्यांना सर्वच परिक्षा केंद्र जवळ हवे असतात.
जास्त उमेदवारांना संधी मिळण्यासाठी प्रयत्न
जास्त उमेदवारांना परिक्षा देण्याची संधी मिळावी यासाठी निर्णय घेण्यात आले आहेत.
१) उमेदवारांने अनेक पदांसाठी अर्ज केला तरीही ज्या पदाच्या परिक्षेसाठी बसतील त्याच पदाच्या नियुक्ती साठी त्यांचा विचार केला जाईल.
२) ५२ संवर्गातील पदासाठी परीक्षा दोन शिफ्ट मध्ये घेण्यात येतील. एका शिफ्टमध्ये दहावी ते बारावी शैक्षणिक पात्रता आवश्यक असणा-या पदांसाठी तर दुस-या शिफ्टमध्ये पदवी आणि त्यावरील शैक्षणिक पात्रता आवश्यक असणा-या पदांचा समावेश केला आहे.
३) परिक्षा केंद्र देताना उमेदवारांच्या प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार केला आहे.
४) उमेदवारांनी एका मंडळात वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज केला असल्यास त्यासाठी एकाच शहरात दोन शिफ्ट मध्ये परीक्षा केंद्र देण्यात आले आहे.
५) पुणे, नाशिक, अकोला मंडळात जास्त अर्ज आले आहेत. त्यामुळे त्या मंडळातील उमेदवारांना नजिकच्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रे दिली आहेत.
दिव्यांग उमेदवारांना जवळचे केंद्र
उमेदवारांना शक्यतो जवळचे केंद्र दिले आहे. मात्र वेगवेगळ्या नेमणूक अधिका-यांचे अंतर्गत अर्ज केला असल्यास त्या अधिकारी कार्यक्षेत्रात केंद्र देण्यात आले आहे. प्रवेशपत्रावर छायाचित्र आणि सही अस्पष्ट असल्यास उमेदवारांनी न्यासा कम्युनिकेशन कंपनीशी संपर्क साधावा.
माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नाही
माजी सैनिकांना प्रवेश शुल्क नसल्याने नऊ हजार माजी सैनिकांना प्रवेश पत्र देण्यात आले आहे. अहमदनगर जिल्ह्यात नागपूर नावाचे गाव आहे. ते परीक्षा केंद्र आहे. त्यामुळे प्रवेशपत्रावर अहमदनगर जिल्हा नमूद केला आहे. काही प्रवेश पत्रात पिनकोड चुकला आहे. मात्र पत्ता बरोबर आहे. पिनकोड सुधारणा केली जाईल, असे डॉ. पाटील यांनी नमूद केले आहे.