सभागृहातील कार्यक्रमासाठी 200 व्यक्तींची मर्यादा राज्य सरकारने हटवली

मुंबई,

राज्य सरकारने शिवसेनेच्या दसरा मेळाव्याआधी एक महत्वपूर्ण निर्बंध शिथिल केल्यामुळे शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एक हजारांहून अधिक शिवसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित राहू शकणार आहेत. बंदिस्त सभागृहात होणार्‍या कोणत्याही कार्यक्रमासाठी सरकारने घातलेली कमाल 200 व्यक्तींच्या उपस्थितीची अट आता शिथील करण्यात आली आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोरोना नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांच्या टीकेबरोबरच कायदेशीर अडचणीही निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत सरकारी पातळीवर खल होऊन ही अट शिथिल करण्यात आली. यासंदर्भातील आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निर्गमित केले आहेत.

22 ऑक्टोबरपासून राज्यातील बहुतांश निर्बंधांमध्ये शिथिलता येणार आहे. कोणत्याही बंदिस्त सभागृहात होणार्‍या कार्यक्रमास एकूण क्षमतेच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती. आता केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने बंदिस्त सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली 200 व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून घेतली आहे. याबाबतचा आदेश मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी निर्गमित केला असून सभागृहाच्या एकूण क्षमतेच्या 50 टक्के उपस्थितीची परवानगी आता देण्यात आली आहे. सभागृहात येणार्‍या सर्वांचे लसीकरण झालेले असले पाहिजे आणि या नियमांचा भंग झाल्यास सबंधित आयोजकांना 50 हजार रूपयांचा दंड आकारला जाईल, असेही आदेशात म्हटले आहे.

राज्यावरील कोरोनाचे संकट आता ओसरत असल्यामुळे राज्य सरकार अनेक गोष्टींवरील निर्बंध शिथिल करत आहे. शाळा, मंदिरे सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर 22 ऑक्टोबरनंतर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे सुरु होणार आहेत. गेले अनेक दिवस बंद असलेली चित्रपट-नाट्यगृहे कधी सुरु होणार अशी चर्चा चित्रपट-नाट्यवर्तुळात होत होती. सिने रसिक देखील कधी थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहता येईल याची वाट बघत होते. तर नाट्यप्रेमी त्यांच्या लाडक्या तिसर्‍या घंटेचा आवाज कानात कधी घुमणार याची प्रतिक्षा करत होते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!